इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिन आणि छत्रपती शाहू महाराज जयंती (सामाजिक न्याय दिन) निमित्त गुरुवार, दिनांक २६ जून रोजी दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराचे आयोजन इचलकरंजी महानगरपालिका, अलायन्स हॉस्पिटल आणि इचलकरंजी केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलायन्स हॉस्पिटल येथे करण्यात आले. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमावेळी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, डॉ. समुवेल भंडारे, आयेशा राऊत, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी शहाजी राणे, शितल कांबळे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ शहरातील सुमारे ६० दिव्यांग लाभार्थ्यांनी घेतला. वैद्यकीय तपासणी व सल्ला, आवश्यक औषधे आणि मूलभूत आरोग्य सेवा यांचा लाभ मिळवून दिला गेला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार आणि समाज विकास अधिकारी सुनील शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय, इचलकरंजी महानगरपालिकेकडून दिव्यांग व्यक्तींसाठी नोंदणी प्रक्रिया शनिवार, दिनांक २८ जून व रविवार, दिनांक २९ जून रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहणार आहे.
संबंधित लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.