सांगली संस्थानच्या गणेशमूर्तीचे शुक्रवारी शाही परंपरेनुसार मिरवणुकीने कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सूर्यास्ताच्या वेळी भक्तिमय वातावरणात गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. दरबार हॉलमध्ये विजयसिंह राजे पटवर्धन,महाराणी राजलक्ष्मी पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आदींसह मानकर्यासमवेत दुपारी गणेशाची विधिवत आरती करण्यात आली. (Sangli) त्यानंतर सजविलेल्या रथातून गणेशमूर्तीची शाही मिरवणूक काढण्यात आली.

गणेश दुर्गापासून सुरू झालेली मिरवणूक राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणेश मंदिर, टिळक चौक मार्गे कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर पोहोचली. पारंपरिक राजेशाही थाटात निघालेल्या या मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिक व भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. सजविलेल्या रथात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये उत्साह दिसून आला. (Sangli) मिरवणूक मार्गावर भव्य दिव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सजविलेल्या रथातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर भाविकांकडून पेढ्यांची व फुलांची उधळण करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या मिरवणुकीत पोलीस अधिक्षक तुषार दोशी, अप्पर अधिक्षक कल्पना बारवकर , महापालिका आयुक्त संजीता महापात्र आदींसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत सजवलेले घोडे, धनगरी ढोल, झांज पथक, ताशा पथक, लेझीम पथक या पारंपारिक वाद्यांचा समावेश होता. गणवेषातील ताशा पथकाच्या वादनाने उपस्थितांची वाहवा मिळवली तर गणवेशातील तरूणांचे भगव्या ध्वजासह ढोलाच्या तालावरील नृत्य लक्षवेधी ठरले. शाही परंपरेचा वारसा जपत निघालेल्या या मिरवणुकीमुळे सांगली संस्थानच्या गणेशोत्सवातील ऐतिहासिक परंपरेचे दर्शन नागरिकांना घडले.
सूर्यास्तावेळी कृष्णा नदीवरील सरकारी घाटावर विधीवत पूजा करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सरकारी घाटावर संस्थान गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर (Sangli) अनेक घरगुती गणेशाचे विसर्जन करण्यासाठी नदीकाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. या ठिकाणी महापालिकेने निर्माल्य कुंड, मूर्तीदान केंद्र सुरू केले असून नदी प्रदुषण टाळण्याचे आवाहन महापालिकेचे कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते करत होते. मिरजेतही सायंकाळी गणेश तलाव याठिकाणी घरगुती गणेश विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती.
हेही वाचा :
UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?
‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?
भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?