सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्यासोबत चक्क पेट्रोलसदृश्य पदार्थ बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विहिरीच्या पाण्यात पेट्रोलचा वास आणि त्याचे वाढते प्रमाण (petrol) यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमदी येथील शेतकरी दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीपासून अवघ्या सुमारे ३०० मीटर अंतरावर एचपी पेट्रोल पंप आहे. (petrol) त्यामुळे पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीतून किंवा पेट्रोल वाहून नेणाऱ्या पाइपलाइनमधून गळती होऊन पेट्रोल जमिनीत झिरपत विहिरीच्या पाण्यात मिसळत असावे, असा अंदाज स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे विहिरीतील पाणी शेतीसाठी वापरणेही धोकादायक ठरू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, संबंधित कंपनीच्या पथकाने पेट्रोल पंपाची तपासणी केली असून पंपामध्ये कोणत्याही प्रकारची गळती नसल्याचा अहवाल देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्यावरही ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, पेट्रोल पंप तपासणीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आल्यानंतर विहिरीतील पेट्रोलचे प्रमाण कमी झाल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. (petrol) मात्र, आता पुन्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोलसदृश्य पदार्थ विहिरीत येऊ लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
विहिरीत पेट्रोल नेमके कुठून येत आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परिसरात पेट्रोलची गळती होत असल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून विहिरीतील पाणी आणि परिसरातील मातीचे नमुने तपासावेत, तसेच पेट्रोल पंप आणि भूमिगत पाइपलाइनची सखोल तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एखादा मोठा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय