जब्बार पटेल यांनी केले आजच्या “व्यवस्थे” वर प्रहार

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल(Jabbar Patel)यांचे सर्वच चित्रपट “व्यवस्थे “वर प्रभावी भाष्य करणारे. गुरुवारी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंती दिनानिमित्त राजश्री शाहू पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी शाहूकालीन व्यवस्थेचे दाखले देऊन आजच्या व्यवस्थेवर कठोर भाष्य केले. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे राज्यकर्त्यांना आणि नोकरशहाना खडे बोल सुनावणारे आहेत. खरे तर शाहूकालीन व्यवस्था आणि आजची व्यवस्था या विषयावर एखादा सुंदर चित्रपट निर्माण होऊ शकतो.

राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे सामाजिक क्रांतीकारक म्हणून पाहिले जाते. इसवी सन 1902 मध्ये करवीर संस्थानात त्यांनी मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेतला होता. या आरक्षण निर्णयावर सही घेण्यासाठी त्यांनी पंतप्रतिनिधी यांच्या अंगावर वाघाचं पिल्लू सोडून, भीती दाखवली होती. आपले प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसामान्य जनतेने सरकारी कार्यालयात, मंत्र्यांकडे वाघाचे पिल्लू घेऊन जायला हवे का असा प्रश्न उपस्थित करताना जब्बार पटेल यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.

जब्बार पटेल(Jabbar Patel) यांनी सिंहासन, सामना वगैरे आशय घन चित्रपट सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून दिग्दर्शित केले
आहेत. त्यांच्या सर्वच चित्रपटांमध्ये त्यांनी व्यवस्थेला अधोरेखित केलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांच्याकडून व्यवस्था या विषयावर भाष्य करणे अपेक्षित होते आणि झालेही तसेच. राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन सत्ता राबवणाऱ्यांना सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणारी व्यवस्था बदलता आलेली नाही यावर आपली परखड मते व्यक्त केली.

संस्थानातील मागासवर्गीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांना आरक्षणाची गरज आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी 50 टक्के आरक्षण जाहीर केले पण या निर्णयाला सुद्धा तत्कालीन व्यवस्थेने विरोध केला होता पण हा विरोध मोडून त्यांनी आपल्या निर्णयाचे आदेशात रूपांतर केले आणि आदेशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणारी एक वेगळी व्यवस्था त्यांनी निर्माण केली‌ होती. पण आजच्या राज्यकर्त्यांना मात्र व्यवस्था नव्हे तर व्यवस्थेतील त्रुटी सुद्धा दूर करता येत नसतील तर मग सामान्य जनतेने काय करायचे हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न अस्वस्थ करणारा आहे.

कोल्हापूर हे चित्रपट निर्माण करणार्‍यांच्यासाठी स्कूल होते, पण आता ते राहिलेले नाही किंवा ते जपता आलेले नाही याबद्दल जब्बार पटेल(Jabbar Patel) यांनी व्यक्त केलेली खंत योग्यच म्हणावी लागेल. कारण मराठी चित्रपट सृष्टीचे मानदंड जयप्रभा आणि शांत किरण स्टुडिओच्या माध्यमातून येथे होते आणि आता ते राहिलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. राज्य शासनाला हे दोन्ही स्टुडिओ वाचवता आले असते, पण कुणाचा तरी शब्द मोडायचा नाही म्हणून या दोन्ही स्टुडिओचा बाजार झालेला आहे. हे वास्तवही त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात बोलून दाखवले आहे.

एकीकडे बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्रपती व्ही शांताराम, मास्टर विनायक यांची नावे घेऊन कोल्हापूरची मराठी चित्रपट सृष्टी किती समृद्ध आहे असे राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी सांगायचे आणि दुसरीकडे माझा नेमका उलटा व्यवहार करायचा. कोल्हापूरला चाळीस वर्षांपूर्वी राज्य शासनाने चित्र नगरी दिली पण आजही ती पूर्णांशाने झालेली आहे असे म्हणता येणार नाही. त्यालाही राज्यकर्ते आणि प्रशासन जबाबदार आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

जब्बार पटेल यांनी राजश्री शाहू पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात राजर्षी शाहू महाराज आणि आजचे राज्यकर्ते यांची परखड शब्दात तुलना केली. शाहूकालीन व्यवस्थेचे विश्लेषण केले. सर्वसामान्य रयतेसाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता वापरली.

पण त्यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या मंडळींच्याकडून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेसाठी सत्ता वापरली जाते का या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक येत नाही. सर्वसामान्य माणसाचे प्रश्न शासनाकडे, प्रशासनाकडे प्रलंबित आहेत आणि असतात. ते सोडवून घेण्यासाठी जनतेने वाघाचे पिल्लू दाखवून त्यांना भीती दाखवायची का हा त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न राज्यकर्त्यांवर आसूड ओढणारा आहे.

जब्बार पटेल यांनी दृकश्राव्य माध्यमाचा अतिशय प्रभावीपणे वापर केला आहे. या माध्यमातून त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले आहेत, समाज जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात'”व्यक्त”होताना
आपल्या मनातील सल बोलून दाखवला आहे.

हेही वाचा :

ट्रंपच्या T1 स्मार्टफोनने लोकांना दिला धोका? चक्क लाँचिंगनंतर

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून जेठालाल बबिताची एक्झिट? 

ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’