कोल्हापूर : कसबा बावडा येथील २३ वर्षीय युवतीचा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवकाने अमानुषपणे खून(Murder ) केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे घडली. लग्नास नकार दिल्याने झालेल्या या घटनेने कोल्हापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या युवतीचे नाव समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी असून ती जयभवानी गल्लीत राहत होती. आरोपी सतिश मारूती यादव (वय २५, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) हा घटनेनंतर पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलिसांची संयुक्त पथके कार्यरत झाली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सतिश व समीक्षा एका इव्हेंट कंपनीत सहकारी होते. दोघांत जवळीक वाढून ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. काही दिवसांपूर्वी सतिशने समीक्षाकडे लग्नाची मागणी केली होती. मात्र तिने नकार दिल्याने रागाच्या भरात सतिशने तिच्या छातीत धारधार चाकू खुपसून तिचा खून(Murder ) केला. इतकेच नव्हे, तर चाकू तिच्या बरगडीत अडकला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली असून, सरनोबतवाडी आणि मणेरमळा परिसर हादरला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक व नातेवाईकांची गर्दी झाली होती. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास अधिक गतीने करण्याचे आदेश दिले आहेत.
समीक्षाच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून आरोपीच्या मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे शोध सुरू असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
हेही वाचा :