कोणतेही प्राधिकरण असो होर्डिंगसाठी स्टॅक्चरल मजबुती प्रमाणपत्र बंधनकारक

रेल्वेसह मुंबईतील(mumbai) कोणतेही प्राधिकरण असले तरी होर्डिंग उभारण्यासाठी स्ट्रक्चरल मजबुतीचे प्रमाणपत्र पालिकेला सादर करणे बंधनकारक राहणार आहे. अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशारा आज पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी दिला. घाटकोपर छेडानगरसारखी होर्डिंग दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व होर्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासणी सुरू करण्याचे आदेशही वॉर्ड स्तरावर देण्यात आल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

आयुक्त भूषण गगराणी यांनी आज दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यापुढे कोणत्याही प्राधिकरणात होर्डिंग असले तरी त्यासाठी पालिकेकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. याबाबत रेल्वे, बेस्ट, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभाग, म्हाडा आदी सर्वच प्राधिकरणांना पालिकेने सूचना दिल्याचे ते म्हणाले.(mumbai)

मुंबई महानगरात कोणत्याही व्यवसायासाठी मुंबई महानगरपालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामासाठीदेखील प्रोव्हिजिनल (तत्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोल पंप चालवण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, इत्यादी बाबतची महानगरपालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.


नवे धोरण बनेपर्यंत होर्डिंगला परवानगी नाही

जाहिरात फलकांचा आकार, संरचनात्मक स्थिरता यासारख्या बाबींचा प्रमाणित कार्यपद्धतीत किंवा धोरणांमध्ये समावेश असणे हे नागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे शासकीय यंत्रणांनादेखील त्यातून पर्यवेक्षण करण्यासाठी मदत होते व दुर्घटना टाळता येतात. त्यामुळे नागरी सुरक्षिततेला सर्वेच्च प्राधान्य देऊन आणि त्यासोबत शहराला बकालपणा येणार नाही, अशा रितीनेच या पुढे जाहिरात फलकांना परवानगी दिली जाईल. त्या दृष्टीने जाहिरात फलक धोरणामध्ये तरतुदींचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे तूर्तास नवीन जाहिरात फलकांना परवानगी दिली जाणार नाही, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार!

संविधान बदलण्याच्या भूमिकेवर मोदी गप्प का? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून, नोंदणी अर्ज नव्याने करावा लागणार