इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजीसह राज्यभरातील सूक्ष्म, लघु व मध्यम वस्त्रउद्योग उद्योजकांसाठी एक आनंददायक आणि दिलासा देणारी बातमी आहे. गेली 10 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि उद्योजकांसमोर अडथळा ठरलेला सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गतचा ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवान्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
या जटिल विषयावर आमदार मा. श्री. राहुल आवाडे यांनी सातत्याने व ठामपणे पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना राज्याचे उद्योग मंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांची सकारात्मक साथ लाभली. या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून या संदर्भात अधिकृत अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार 14 मे 2015 पूर्वी ग्रामपंचायतीकडून दिलेले बांधकाम परवाने ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे अनेक वस्त्र उद्योजकांना औद्योगिक मान्यता मिळवण्यात मोठा फायदा होणार आहे.
तसेच, सामुहिक प्रोत्साहन योजना 2013 अंतर्गत पात्रता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उद्योजकांना आता वस्त्रोद्योग विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळवून ५ टक्के व्याज अनुदान देखील मिळणार आहे.
या निर्णयामुळे इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, हातकणंगले परिसरातील हजारो वस्त्रउद्योगांना चालना मिळणार असून, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
या ऐतिहासिक निर्णयामुळे मा. आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वगुणांची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, उद्योजकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.