इचलकरंजीतील कचरा उठावाच्या ढिसाळ कारभारावर महापालिकेची कारवाई, मक्तेदारास कारणे दाखवा नोटीस

इचलकरंजी शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येवर माध्यमांनी सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाने जाग येत कारवाईला सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून शहरात कचरा उठावाचे काम अत्यंत ढिसाळ आणि अकार्यक्षमपणे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित कचरा संकलन मक्तेदारास मुख्यालयात बोलावून तातडीची बैठक घेतली.

या बैठकीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मक्तेदारास थेट लेखी नोटीस बजावली असून त्यात शहरात सुरू असलेल्या कचरा व्यवस्थापनातील अनियमितता, कराराच्या अटींचे उल्लंघन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दत्त संगेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटीसमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, शहरातील कचरा उठाव संदर्भातील वारंवार माध्यमांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत आहे.

महापालिकेने दिलेल्या कराराचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित मक्तेदाराकडून कारणे मागवण्यात आली असून, कशासाठी मक्ता रद्द करू नये, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर तातडीने कचरा व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या सक्त सूचना देखील देण्यात आल्या आहेत. जर कामामध्ये लक्षणीय सुधारणा झाली नाही, तर मक्तेदाराचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

या कारवाईमुळे महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर नियंत्रण बसेल का, कचरा व्यवस्थापनात अपेक्षित सुधारणा होतील का, याकडे आता इचलकरंजीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. अनेक वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना आता प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा आहे.