आजपासून 2 जानेवारीपर्यंत देशात ‘राष्ट्रीय दुखवटा’! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?

देशाचे माजी पंतप्रधान(Prime Minister) मनमोहन सिंग यांचं गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झालं. दोन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांपासून ते अनेक प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे.

दरम्यान, (Prime Minister)मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. कर्नाटक, तेलंगणसारख्या राज्यांनी आज म्हणजेच 27 डिसेंबर रोजी शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सात दिवसांच्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला म्हणजे नेमकं काय होणार? आता 2 जानेवारीपर्यंत देशात काय होणार? याबद्दल जाणून घेऊयात…

देशातील एखाद्या प्रमुख संवैधानिक पदांवर काम करत असलेल्या किंवा यापूर्वी काम केलेल्या व्यक्तींच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो. राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्यानंतर सर्वच शासकीय इमारतींबरोबरच जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी असलेले राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवले जातात. राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत संसदेबरोबरच सर्व सचिवालये, सर्व राज्यांमधील विधानसभा आणि महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जातो. या शिवाय देशाच्या बाहेरील भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वजही अर्ध्यावर उतरवला जातो.

निधन झालेल्या व्यक्तीचे सामाजिक, राजकीय किंवा ती ज्या क्षेत्रात कार्यरत असेल त्या क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदानाचा विचार करुनच सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर करायचा की नाही हे ठरवलं जातं. मात्र राष्ट्रीय दुखवटा कधी जाहीर करावा याबद्दल कोणतेही ठोस आणि कठोर नियम नाही. हा निर्णय त्या त्यावेळी घेतला जातो. राजकारण, साहित्य, कायदा, विज्ञान, समाजिक क्षेत्र, क्रिडा, मनोरंजन याशिवाय प्रशासकीय क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या देशातील नामवंत व्यक्तींना राजकीय सन्मान देण्याच्या उद्देशाने त्यांच्या निधानानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला जातो.

राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेल्या कालावधीमध्ये देशातील सर्व सरकारी इमारतींवरचे राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणले जातात. प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकाविण्याची जबाबदारी असलेल्या विभागांना यासंदर्भात सूचना दिल्या जातात. यापूर्वी केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपती राष्ट्रीय दुखवट्याची घोषणा करायचे.

मात्र आता राज्य सरकारांनाही दिवंगत व्यक्तीच्या सन्मानार्थ राजकीय शोक व्यक्त करण्यासाठी शासकीय दुखवटा जाहीर करण्याचा अधिकार असतो. मनमोहन सिंग यांच्या निधानंतर कर्नाटक आणि तेलंगनने लगेच सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. शासकीय तसेच राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात कोणतेही सरकारी किंवा औपचारीक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत किंवा आयोजित कार्यक्रम पुढे ढकलले जातात.

केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला म्हणजे तो केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जाहीर केला जातो. राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय गहमंत्रालयाकडून निर्देश जारी केले जातात. राज्य पातळीवरही शासकीय दुखवटा जाहीर केला जातो. राज्यस्तरावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय असो किंवा दुखवटा जाहीर करण्याचा निर्णय असो तो राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा करून घेतात. त्यानंतर निर्णय जाहीर केला जातो.

राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीमध्ये सामान्यपणे पहिल्या दिवशी सुट्टी जाहीर केली जाते. मात्र दरवेळेस असं होतं असं नाही. सुट्टी देण्याचा निर्णय हा सरकारी पातळीवर होतो. राष्ट्रीय दुखवटा हा राजकीय असल्याने थेट सर्वसामान्यांवर त्याचा काही परिणाम होत नाही. राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात कोणतेही शासकीय कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत. त्यामुळेच सरकारी योजनांअंतर्गत काही विशेष कार्यक्रम आयोजित केले असताना राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याचे हे कार्यक्रम पुढे ढकलेले जातात. दैनंदिन व्यवहारांवर राष्ट्रीय दुखवट्याचा काही परिणाम होत नाही. शासकीय कार्यालये आणि कामं नियमिपणे सुरु असतात.

2013 साली दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर पाच दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला. 2018 साली द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. याच वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला.

2019 मध्ये गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. पुढल्या वर्षी म्हणजेच 2020 साली भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेलेला. 2021 साली गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला होता.

हेही वाचा :

कल्याण प्रकरणावर मुख्यमंत्री शिंदे आक्रमक: ‘अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणार’

अमेरिकेत भारतीय सिनेमाचा धडाका: आगामी रिलीजसाठी प्रेक्षकांमध्ये उत्साह

मुलगी हॉस्टेल सोडून पळाली, रस्त्यात मिळेल त्याने केला बलात्कार