पंचगंगा नदीला पूरस्थितीची चाहूल – इचलकरंजीतील जुना पूल वाहतूकीसाठी बंद; प्रमोद बचाटे यांची पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून, या वाढलेल्या पाण्यामुळे शहरातील जुना पूल धोक्याच्या पातळीवर आला आहे. नदीचे पाणी थेट पुलाच्या खाली घासत असून, यामुळे संभाव्य दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर सायंकाळी ७ वाजता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जुना पूल वाहतूकीसाठी तात्पुरता बंद केला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


घटनास्थळी भारतीय जनता पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते श्री. प्रमोद बचाटे यांनी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपस्थित नागरिकांना स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले असून, स्थानिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवेदनही केले आहे.

प्रमोद बचाटे यांनी सांगितले की, “सध्या पूरस्थिती टाळण्यासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.”

महानगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असून, नदीच्या पाण्याची पातळी नियमित मोजली जात आहे. दरम्यान, जुना पूल बंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, शहरात पर्यायी मार्गाने वाहनांची चळवळ सुरु आहे.

शहरवासीयांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन स्थानिक प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.