कोकणचा गणेशोत्सव(Ganeshotsav) म्हटलं की लाखो चाकरमानी मुंबई, ठाणे, पालघर आदी शहरी भागातून आपापल्या गावी रवाना होतात. हीच गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा 5000 जादा बस सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या(Ganeshotsav) पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची रेलचेल राहणार आहे. 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिरिक्त बसेस धावणार असून, हे नियोजन कोकणात गावी जाणाऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे, 27 ऑगस्टपर्यंतच्या नियमित 597 गाड्या दोन महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं एसटीकडून सांगण्यात आलं.
एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून 5000 जादा बसेसचे गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू होणार आहे. हे आरक्षण सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुलं असणार असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि अन्य प्रवर्गांना सवलती मिळणार आहेत. या सुविधा कोकणात गणपती साजरा करणाऱ्या हजारो चाकरमानी कुटुंबांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत.
मुंबई सेंट्रल आणि परळ येथून कोकणमार्गावर सध्या रोज 12 बस धावत आहेत. त्याचप्रमाणे ठाणे आणि पालघरहूनही नियमित बस सेवा चालू आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्यात भर घालून 5000 जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही बसेस विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसारख्या जिल्ह्यांमध्ये धावणार आहेत.

सुरक्षिततेवर भर, तांत्रिक पथकं सज्ज :
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी करण्यासाठी एसटीकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. बसस्थानकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत राहणार आहेत. तसेच महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथकं आणि यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती:
जादा बस सेवा कालावधी: 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025
गट आरक्षण सुरू: 22 जुलै 2025 पासून
आरक्षण माध्यम: एसटीचे अधिकृत संकेतस्थळ
सवलती : ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विशिष्ट प्रवर्गासाठी उपलब्ध
हेही वाचा :
गणेशोत्सवाची सजावट बोंबलली? राज्यात कृत्रिम, प्लास्टिक फुलांवर बंदी
‘तुम्ही कोल्हापुरी चपलांचे मालक नाही, मग तुमचा…’; ‘प्राडा’ची टीम कोल्हापुरात असतानाच HC चा दणका
कोल्हापुरात पावसाची दमदार बॅटिंग; पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अनेक धरणेही भरली