भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान एक दु:खद बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट(cricket) परिषदेच्या अंपायर पॅनलमधील सदस्य आणि अफगाणिस्तानमधील नामवंत अंपायर बिस्मिल्लाह जान शिनवारी यांचे सोमवारी (7 जुलै) रात्री निधन झाले. वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

बिस्मिल्लाह शिनवारी सर्जरीसाठी पाकिस्तानच्या पेशावर शहरात गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटाची चरबी कमी करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन केले. शस्त्रक्रियेनंतर काही वेळातच त्यांची तब्येत बिघडली आणि संध्याकाळी 5 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शरीर रात्री तोरखम मार्गे अफगाणिस्तानात आणण्यात आले आणि अचिन येथील त्यांच्या मूळ गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिस्मिल्लाह शिनवारी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामने अंपायर म्हणून पार पाडले होते. अफगाणिस्तान क्रिकेट(cricket) बोर्डनुसार, त्यांनी 34 वनडे, 26 टी-20 आंतरराष्ट्रीय, 31 फर्स्ट क्लास, 51 लिस्ट ए आणि तब्बल 96 देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्ये अंपायरिंग केली होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय अंपायरिंगचा प्रवास डिसेंबर 2017 मध्ये सुरू केला होता, जेव्हा त्यांनी शारजाह येथे अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील वनडे सामन्यात अंपायरिंग केली होती.
बिस्मिल्लाह यांच्यामागे पत्नी, पाच मुले आणि सात मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ अफगाणिस्तानच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करताना म्हटले, “क्रिकेटमध्ये त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. क्रिकेट समुदाय त्यांना कायम आठवत राहील. त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही संवेदनेने आहोत.”
ACB's Condolence and Sympathy Message
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2025
ACB’s leadership, staff, and entire AfghanAtalan family are deeply shocked and saddened by the demise of Bismillah Jan Shinwari (1984 – 2025), a respected member of Afghanistan’s elite umpiring panel.
It is with deep sorrow that we share… pic.twitter.com/BiZrTOLe6m
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून श्रद्धांजली वाहत म्हटले, “बिस्मिल्लाह शिनवारी यांच्या निधनाने अफगाण क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि संपूर्ण क्रिकेट समुदायाला सांत्वन देतो. अल्लाह त्यांना जन्नत नसीब करो.
हेही वाचा :
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
देशातील अनोखे मंदिर जिथे जाताच लोकांना मिळते सरकारी नोकरी; दूरदूरवरून भाविक येतात दर्शनासाठी