…तर गयानात हिंदुस्थानचा उपांत्य सामना

2007 साली झालेले आर्थिक अपयश धुऊन काढण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट (cricket)मंडळाने पुन्हा एकदा कंबर कसलीय. त्यामुळे येत्या 2 जूनपासून सुरू होणारा टी-20 वर्ल्ड कप हिंदुस्थानी प्रेक्षकांना समोर ठेवून आयोजित केला जातोय. या वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचा सुपर एटमधील प्रवेशही निश्चित असल्यामुळे सुपर एटमध्ये हिंदुस्थानच्या तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांच्या वेळा रात्री 8 वाजताच्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच उपांत्य फेरीत हिंदुस्थान पोहोचला तर तो सामना गयानाच्या प्रोव्हिडन्समध्येच खेळविला जाणार आहे. मग त्या सामन्यात हिंदुस्थानचा प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो.

17 वर्षांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा हिंदुस्थानचा संघ साखळीतच बाद झाल्याने आयोजकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. तसेच हिंदुस्थान बाद होताच या स्पर्धेचा टीआरपीही कोसळला होता(cricket). हिंदुस्थानी चाहत्यांनी मध्यरात्री होणाऱया या सामन्यांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे विंडीज मंडळ आणि आयसीसीने मिळून टी-20 वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांच्या वेळा हिंदुस्थानी संघासह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांच्या वेळेनुसार ठेवल्या आहेत. साखळीत हिंदुस्थानचा संघ आपले सर्व सामने हिंदुस्थानी वेळेनुसार रात्रीच खेळणार आहे. सुपर एटमध्येही हिंदुस्थानी संघाच्या वेळा साधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला आहे. हिंदुस्थान साखळीत पहिला असो किंवा दुसरा, सुपर एटमध्ये हिंदुस्थानच्या सामन्यांना काहीही फरक पडणार नाही, असे वेळापत्रक आखण्यात आले आहे. सुपर एटमध्ये चार-चार संघांचे दोन गट पाडले जाणार असून प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. हिंदुस्थानचे तीनपैकी दोन सामने रात्री होतील, असाच कार्यक्रम आयसीसीने तयार केला आहे. मात्र उपांत्य फेरीत कोणता संघ कुठे खेळेल हे अनिश्चित आहे, पण हिंदुस्थान उपांत्य फेरीत पोहोचला तर तो आपला सामना गयानात खेळणार हे आधीच निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्याची वेळ रात्री 8 वाजताची ठेवण्यात आली आहे. हिंदुस्थानी संघ दुसरा उपांत्य सामना खेळणार असल्यामुळे पहिला उपांत्य सामना अन्य दोन संघांत हिंदुस्थानी वेळेनुसार सकाळी 6 वाजता सुरू होईल. आयसीसीने स्पर्धेचा अंतिम सामनाही हिंदुस्थानी वेळेनुसारच खेळविणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. हिंदुस्थानचा संघ अंतिम सामना खेळला तर वेस्ट इंडीज आणि आयसीसीसाठी ‘सोने पे सुहागा’च असेल. मात्र संघाची घोडदौड उपांत्य सामन्यातच थांबली तरी हिंदुस्थानी चाहत्यांना अंतिम सामन्याचा मनमुराद आनंद लुटता यावा म्हणून वेळ रात्री 7.30 ची ठेवण्यात आली आहे. या वर्ल्ड कपचे वेळापत्रक हिंदुस्थानी संघ आणि हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींना समोर ठेवूनच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप वेस्ट इंडीज- अमेरिकेत असला तरी तो हिंदुस्थाननेच आयोजित केल्याचा भास होणार हे मात्र नक्की आहे.


हिंदुस्थानी संघ आपल्या सुपर एटमधील लढती कुठे खेळू शकतो, याची कल्पना तर चाहत्यांना आली आहे. पण उपांत्य सामनाही कुठे होऊ शकतो, हे आधीच कळावे म्हणून आयसीसीने गयानाचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे 27 जूनला होणाऱया गयानातील लढतीचे विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंग हिंदुस्थानी चाहत्यांना करणे सोपे होणार आहे. क्रिकेट पाहणारी 75 टक्के जनता हिंदुस्थानी असल्यामुळे आयोजक आणि आयसीसीकडून त्यांच्या आदरतिथ्याची धावपळ केली जात आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; सट्टाबाजारात उलाढाल जोरात

“एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले…” थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक