रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही! सरकारने घेतला मोठा निर्णय

रेशनवर(ration) मिळणाऱ्या धान्याचा गैरवापर करणाऱ्यांवर सरकारकडून आता थेट कारवाई करण्यात येणार आहे. अनेक जण शासकीय दराने मिळणारे रेशनचे धान्य दुसऱ्यांना विकतात, बदल्यात पैसे किंवा इतर वस्तू घेतात. मात्र आता शासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत डिजिटल वितरण प्रणालीद्वारे प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मेहकर तालुक्यात हजारो क्विंटल धान्य दरमहा वाटप केलं जातं. हे वितरण आता डिजिटल ट्रॅकिंग प्रणालीद्वारे होत असल्यामुळे कोणताही गैरव्यवहार लपवणे अशक्य झाले आहे. लाभार्थ्यांचे व्यवहार थेट शासनाच्या डेटाबेसमध्ये नोंदवले जात असल्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना यापुढे मोकळं रान राहणार नाही.

दुकानदारांनाही मिळाला इशारा :
शासनाने सर्व रेशन(ration) दुकानदारांसाठी दररोजच्या वितरणाची नोंद व्यवस्थित ठेवणे आवश्यक आणि बंधनकारक केलं आहे. जर कोणत्याही दुकानातून धान्य गायब होत असल्याचे आढळले, तर संबंधित दुकानावरही कारवाई केली जाईल. दुकानदार परस्पर धान्य बाजूला काढून विकतात, अशी तक्रार अनेक ठिकाणी झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर या महिन्यांत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याचा धान्यवाटप कार्यक्रम केवळ तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दर बुधवारी दुकानांची सफाई, वितरण नोंदींची तपासणी आणि लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे.

रेशन कार्ड थेट रद्द होणार! :
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम आणि अंत्योदय योजनेअंतर्गत मोफत मिळणारे धान्य कोणालाही विकताना आढळल्यास संबंधित व्यक्तीचे रेशन कार्ड थेट रद्द केले जाणार आहे. तहसीलदार नीलिमा सखाराम निर्धने यांनी या संदर्भात स्पष्ट इशारा दिला आहे. गरजूंपर्यंत योग्य धान्य वेळेवर पोहोचवणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

तहसील प्रशासनाने स्पष्ट केले की, “धान्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही गय केली जाणार नाही. योग्य व्यक्तींना त्यांचा हक्काचं धान्य मिळावं यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक झाले आहे.” त्यामुळे आता गैरप्रकार करणाऱ्यांची खैर होणार नाही, हे निश्चित आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना भकास करून, शक्ती पीठ रस्त्यांचा विकास नको

महाविकास आघाडीत फूट पडणार? काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कोरोनाची लस देते मृत्यूला आमंत्रण? ICMR आणि AIIMS च्या अहवालात मोठा खुलासा…