ट्रकच्या धडकेत वारकरी महिलेचा मृत्यू

पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनात घेऊन कार्तिकी एकादशी निमित्त पायी निघालेल्या पलूस येथील वारकऱ्यांच्या दिंडीला आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे भीषण अपघात झाला. मंगळवार, दि. १७ रोजी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (accident) भरधाव ट्रकने रस्त्याकडेने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत वैशाली ऊर्फ नागिनी संजय कोळी (मूळ रा. बहादूरवाडी, ता. वाळवा, सध्या रा. पुणदी, ता. पलूस) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार वारकरी जखमी झाले आहेत.

याप्रकरणी भगवान कृष्णा पाटील (वय ७९, रा. पुणदी, ता. पलूस, जि. सांगली) यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (accident) त्यानुसार, ट्रकचालक विजय हनुमंत जरग (रा. श्रीकृष्ण कॉलनी, धनगरवाडी, ता. व जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पलूस येथून कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठलनामाचा गजर करीत आणि टाळ-मृदंगाच्या निनादात सुमारे ४० वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते. सोमवारी रात्री पळसखेड येथे दिंडीचा मुक्काम आटोपल्यानंतर, मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास वारकऱ्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. प्रवास सुरू होऊन अवघी काही मिनिटे उलटली असतानाच पावणेसहाच्या सुमारास दिघंची हद्दीत झरे ते पंढरपूर जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबा मंदिराच्या पाठीमागे माने वस्ती परिसरात काळाने घाला घातला. साताऱ्याहून दिघंचीच्या दिशेने येणारा ट्रक (क्र. एमएच ११ एएल ४९६२) दिंडीत पाठीमागून घुसला.

या जोरदार धडकेमुळे दिंडीतील वारकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. (accident) अपघातात वैशाली ऊर्फ नागिनी संजय कोळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर शिवाजी रामचंद्र माळी, शोभा भगवान भिसे (खरात), सुवर्णा मोहन साळुंखे आणि लीलावती शिवाजी माळी (सर्व रा. पलूस) हे चौघे वारकरी जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी आटपाडी व तेथून पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे.अपघाताची माहिती मिळताच आटपाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पवार, सहायक निरीक्षक मचाले आणि महिला उपनिरीक्षक धनश्री करंजकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला उपनिरीक्षक धनश्री करंजकर करीत आहेत.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू