‘इचलकरंजी नगरपरिषदेचं स्वागत की महानगरपालिकेचा विसर?’ — शहराच्या दारात विसरलेली ओळख जनतेच्या मनात खदखद निर्माण करतेय

इचलकरंजी : एकीकडे शहरात इचलकरंजी महानगरपालिकेचा तिसरा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होत असताना दुसरीकडे हातकणंगले रस्त्यावर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळची कमान मात्र अजूनही “इचलकरंजी नगरपरिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहे” अशा जुन्या ओळखीनेच उभी आहे. या विसंगतीकडे आता शहरवासीयांचे लक्ष वेधलं गेलं असून, “हे खरंच महानगर होण्याचे लक्षण आहे का?” असा सवाल सोशल मीडियावर आणि जनतेत चर्चिला जातोय.

या कमानीवर काही महिन्यांपूर्वी एक साधा फ्लेक्स लावून “महानगरपालिका” हे नाव लपवून दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला होता. पण कालाच्या ओघात तो फ्लेक्स फाटून पडला आणि मागील नगरपरिषदेचा चेहरा पुन्हा उघड झाला. आजही त्या ठिकाणी कोणतीही कायमस्वरूपी नवी ओळख दाखवणारी फलक किंवा कलरचा वापर न झाल्याने, ‘इचलकरंजी महानगरपालिका’ या नावाच्या प्रतिमेला धक्का बसतोय, असं नागरिक म्हणत आहेत.

प्रवेशद्वार हे कोणत्याही शहराचं ‘पहिलं दर्शन’ असतं. तिथं जर अजूनही जुनी ओळख पाहायला मिळाली, तर महानगर होण्याचा अभिमान कुठे राहतो? प्रश्न स्पष्ट आहे – महानगरपालिकेकडे त्या कमानीसाठी आकर्षक रंगकाम किंवा परमनंट बोर्ड लावण्यासाठी निधी नाही का? की या शहराच्या सन्मानाकडे दुर्लक्षच होतंय?

सणासुदीला शहर फुलवणारी महानगरपालिका, शहराच्या दारात मात्र नाव लपवतेय. हे दृश्य पाहून इचलकरंजीकर म्हणतात, “विकासाच्या घोषणा असोत वा वर्धापनदिनाचा जल्लोष – सर्व काही ठिक आहे, पण शहराच्या स्वागतद्वाराला मात्र अजूनही नव्या ओळखीची प्रतीक्षा आहे!”

शहराचा सन्मान टिकवण्यासाठी, त्या कमानीवर कायमस्वरूपी आकर्षक अक्षरात – “इचलकरंजी महानगरपालिका आपले सहर्ष स्वागत करीत आहे” असं लिहून, ही विसंगती दूर करावी, हीच आता जनतेची स्पष्ट मागणी आहे.