इचलकरंजी (प्रतिनिधी) :
महानगरपालिका, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांची अजब अक्कल पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. कोठेही उतार नसलेल्या आणि पाणी साचण्याचा कोणताही स्पष्ट कारण नसलेल्या सरळसोट रस्त्यांवरही मनमानी पद्धतीने मुरुम टाकण्याचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे, मोठ्या आणि लहान साइजचा मुरुम एकत्र टाकला जात असून, कुठे किती आणि का टाकायचा याचे कोणतेही नियोजन किंवा मोजमाप दिसून येत नाही. परिणामी रस्त्यांवर उगाचच धुळीचे साम्राज्य, खाचखळगे आणि नागरिकांच्या गैरसोयीचा भडीमार सुरू झाला आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अनेकांनी सोशल मिडिया आणि सार्वजनिक मंचांवर या बेजबाबदार कामांची माहिती देऊन महानगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
“जिथे खरोखर मुरुमाची गरज आहे, तिथे दुर्लक्ष… आणि जिथे रस्ता अगदी प्लेन आहे तिथे मुरुमाची उधळपट्टी – ही कोणती कामपद्धती?” असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
या अनियमिततेची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाने पारदर्शक चौकशी करून जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा हा विषय अधिकच पेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.