त्रिभाषा सूत्र, हिंदी भाषा आणि मुंबईचा संबंध काय?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : केंद्र शासनाचे त्रिभाषा धोरण, हिंदी भाषा(Hindi language) लादण्याचा झालेला अयशस्वी प्रयत्न याचा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याशी संबंध लावला जातो आहे. कारण वेगळे असेल पण यापूर्वीही असे घडलेले आहे. ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठी माणसाची अस्मिता जागृत करण्यासाठी मुंबई मराठी माणसापासून तोडली जाणार आहे असे सांगायला सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी शुक्रवारी मीरा-भाईंदर येथे जाहीर सभेत बोलताना मुंबई गुजरातला जोडण्याचा घाट घातला जात असल्याचा केलेला आरोप हा त्याचाच एक भाग आहे.

त्रि भाषा सूत्र राबवण्याच्या हेतूने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा(Hindi language) शिकवण्याच्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त व्हायला सुरुवात झाली. राज्यातील विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशाराही दिला होता.

हिंदी भाषा या एका विषयावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकत्र आले. त्यांनी दिनांक पाच जुलै रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्धार केला. पण त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील यापूर्वी काढण्यात आलेले आदेश मी मागे घेत असल्याचे जाहीर करून नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर ठाकरे बंधू यांनी वरळी डोम येथे विजयी मेळावा घेतला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून मीरा-भाईंदर येथे अमराठी व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. मीरा भाईंदर येथे मनसेनेही मोर्चा काढला होता. ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांचे सभा झाली होती त्याच ठिकाणी शुक्रवारी राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदी भाषेला आमचा अजिबात विरोध नाही पण सक्ती कदापिही मान्य केली जाणार नाही. मराठीशी तडजोड कोणत्याही स्थितीत केली जाणार नाही. हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न तरी करून पहा मग बघा काय होईल ते असा इशाराच राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिलेला आहे. मुंबई ही गुजरातला जोडण्यासाठी हिंदी भाषेचा(Hindi language) घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

इसवी सन 1980 च्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई ही केंद्रशासित केली जाणार असल्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या संकेताचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुरेपूर फायदा घेऊन मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर ही महापालिका शिवसेनेच्याच ताब्यात आहे.

गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्राचे राजकारण बदलले आहे. महाराष्ट्रात आणि केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही स्थितीत जाऊ द्यायची नाही म्हणून उद्धव ठाकरे यांनी बेरजेच्या राजकारणाला प्राधान्य दिलेले आहे. त्यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करावयाची आहे.त्यांनीही भारतीय जनता पक्षाला ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडावयाची आहे असा आरोप केलेला आहे.

तमाम मराठी माणसांसाठी मुंबई हा अतिशय संवेदनशील विषय आहे. मुंबई मिळवण्यासाठी 105 जणांना आपले बलिदान द्यावे लागलेले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हे कोणालाही स्वप्नातही मान्य होणार नाही.
या एकूण पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू यांनी मराठीचा मुद्दा हातात घेतला आहे.

महाराष्ट्रापासून मुंबई तोडली जाणार ही भीती घातल्यानंतर मराठी माणूस बिथरतो. तो पेटून उठतो. हे माहीत असलेल्या ठाकरे बंधूंनी हाच संवेदनशील मुद्दा सध्या घेतलेला आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई शिवाय नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या महापालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्या त्यांना जिंकावयाच्या आहेत.

दिनांक पाच जुलै च्या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्यात राजकीय युती होईल असे वातावरण तयार झाले आहे मात्र या विषयावर राज ठाकरे यांनी मौन पाळले आहे. आधी निवडणुका जाहीर होऊ द्यात, मग तेव्हाची परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितलेले आहे आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आम्ही दोघे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो आणि त्याच मुद्द्यावर येथून पुढेही एकत्रित असणार आहोत असा खुलासा केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीबद्दल सध्यातरी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच युती बद्दलचे उत्तर मिळणार आहे.

हेही वाचा :

 भारतातील अनोखं मंदिर ज्याचे खांब हवेत लटकतायेत; कुठे आहे हे मंदिर? जाणून घेऊया यामागचं रहस्य

फुफ्फस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

लॉर्ड्‌सवर मोहीम फत्ते करण्याची संधी; भारतीय महिलांचा आज इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना