आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकांचं काम संगणक आणि लॅपटॉपसमोर बसूनच होतं. ऑफिसमध्ये सलग आठ ते दहा तास खुर्चीवर बसून काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, (offices) दीर्घकाळ शारीरिक हालचाल न करता बसून राहण्याची सवय आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. याचा परिणाम केवळ कंबर, पाठ आणि मानेवरच नाही, तर हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो.

चेन्नईतील कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट डॉ. संजीव व्ही.के. यांच्या मते, दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे शरीरातील स्नायूंची हालचाल कमी होते. परिणामी शरीरातील रक्तातील साखर आणि चरबीच्या वापरावर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ अशीच जीवनशैली राहिल्यास रक्तातील साखर, ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉलसारख्या घटकांवर परिणाम होण्याची शक्यता असते. हे घटक हृदयाच्या आरोग्याशी संबंधित असल्याने बैठे काम करणाऱ्यांनी नियमित हालचालींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
सतत बसून राहिल्याने शरीरातील रक्ताभिसरणावरही परिणाम होऊ शकतो. विशेषतः बराच वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे पायांमध्ये रक्त साचण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दीर्घकाळ बैठे काम करणाऱ्यांनी मध्येच उठून शरीराची हालचाल करणं महत्त्वाचं आहे. आजकाल कमी वयातही उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि सतत थकवा यांसारख्या समस्या अनेकांमध्ये दिसून येतात. (offices) त्यामुळे केवळ जिममध्ये व्यायाम करण्यावर अवलंबून न राहता कामाच्या वेळेतही शरीर सक्रिय ठेवण्याची सवय लावणं आवश्यक आहे.
तुमचं काम बैठे असेल तर दर अर्ध्या तासाने काही क्षणांसाठी खुर्चीतून उठण्याची सवय लावा. फोनवर बोलताना शक्य असल्यास काही मिनिटं चालत बोलता येईल. ऑफिसमध्ये छोट्या अंतरासाठी लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणं किंवा कामाच्या मध्ये थोडं चालणं यामुळे दिवसभरातील शारीरिक हालचाल वाढवता येते.जेवणानंतर काही मिनिटं हलकं चालणं हीदेखील चांगली सवय ठरू शकते. लंच किंवा डिनरनंतर पाच ते दहा मिनिटं चालण्यामुळे दीर्घकाळ बसून राहण्याचा कालावधी कमी करता येतो. मात्र, जेवणानंतर लगेच जोरदार व्यायाम करण्याऐवजी हलकं चालणं अधिक योग्य ठरतं.
कामाच्या टेबलावर सतत चहा, कॉफी किंवा पॅकेज्ड स्नॅक्स घेण्याऐवजी जवळ पाणी ठेवण्याची सवय लावा. भूक लागल्यास फळं, नट्स किंवा इतर पौष्टिक पदार्थांचा पर्याय निवडता येतो. संतुलित आहारासोबत नियमित शारीरिक हालचाल केल्यास बैठे जीवनशैलीचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत होऊ शकते.थोडक्यात, ऑफिसचं काम खुर्चीवर बसून असलं तरी संपूर्ण दिवस निष्क्रिय राहण्याची गरज नाही. (offices) कामाच्या वेळेत छोटे-छोटे ब्रेक घेऊन हालचाल करणं, जेवणानंतर चालणं आणि नियमित व्यायाम करणं या सवयी आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास, अचानक चक्कर येणे किंवा इतर गंभीर लक्षणं जाणवल्यास स्वतःहून उपाय न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?