बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यात रविवारी घडलेल्या भीषण अपघातात एका २२ वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला. सोरगाव-मुगळखोड मार्गावर केएसआरटीसी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला.मृत युवकाचे नाव नवीन हनुमंत गोरख (वय २२, रा. जनता प्लॉट, मुधोळ) असे आहे. नवीन आपल्या दुचाकीवरून मुधोळकडे जात असताना बदामीहून इचलकरंजीकडे निघालेली केएसआरटीसी बस समोरून येत होती. मुगळखोड परिसरात दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. (accident) धडकेनंतर दुचाकीच्या पेट्रोल टाकीला तडा जाऊन इंधन रस्त्यावर सांडू लागले आणि काही क्षणांतच दुचाकीला आग लागली. आग वेगाने पसरत बसपर्यंत पोहोचल्याने बसनेही पेट घेतला.

अपघाताची तीव्रता इतकी होती की नवीन गोरख याला दुचाकीपासून दूर होता आले नाही. (accident) आगीच्या विळख्यात सापडल्याने त्याचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. दुसरीकडे, बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून वाहन तातडीने थांबविले. बसमधील प्रवाशांनीही तत्काळ खाली उतरून सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.घटनेची माहिती मिळताच मुधोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (accident) पंचनामा आणि प्राथमिक तपासानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या भीषण अपघाताची नोंद मुधोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?