रेणावी घाटात दोन एसटी बसची भीषण टक्कर दोन ठार?

खानापूर तालुक्यातील रेणावी घाटात दोन बसेसची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन वृद्धांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अपघातात ३८ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये १९ महिला आणि ६ शाळकरी विद्यार्थिनींचा समावेश आहे. ही घटना गुरुवार, दि. १३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. जखमी प्रवाशांचा आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश हृदयद्रावक होता. उपस्थितांनी तातडीने खिडक्या व दरवाजातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत मदतकार्य सुरू केले.नंदा हरिदास त्रंबके (वय ६०, रा. खानापूर) आणि धोंडिराम लक्ष्मण पाटील (७८, रा. बांबवडे, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत.(Renavi Ghat) याबाबत विटा आगाराच्या बसचे चालक माणिक कुमार मंडले यांनी विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस व प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विटा आगाराची विटा ते भिवघाट बस (एमएन १४ बीटी ३२५५) घेऊन चालक माणिक कुमार मंडले भिवघाटच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील मेढा आगाराची विजापूर-जत-सातारा मार्गे मेढा जाणारी बस (एमएच १४ बीटी ४२७०) खानापूरकडून विट्याकडे येत होती. रेणावी घाटातील वळणावर उताऱ्यावर मेढा आगाराच्या बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या भिवघाट बसवर जाऊन जोरदार धडकली.ही धडक इतकी जोरदार होती की, भिवघाट बसच्या चालकाच्या बाजूचा पत्रा १० फुटांपेक्षा जास्त फाटला, तर आतील सीटस्‌ थेट बाहेर आल्या. (Renavi Ghat) मेढा बसच्या चालकाच्या बाजूच्या भागाचाही संपूर्ण चक्काचूर झाला. अपघातग्रस्त दोन्ही बसमधून प्रवास करणाऱ्या दोन वृद्धांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुहास बाबर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी समन्वय साधला आणि जखमींना वैद्यकीय मदत मिळवून दिली. पोलिस, एसटी महामंडळाचे अधिकारी आणि बचाव पथकाने युद्धपातळीवर काम करत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. अपघातातील ३८ जखमींना तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. (Renavi Ghat) यातील गंभीर दुखापत झालेल्या ७ जणांना पुढील उपचारासाठी सांगली, कराड आणि कोल्हापूर येथील रुग्णालयांत हलवण्यात आले आहे, तर ९ जखमींवर विट्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

माजी खासदार राजू शेट्टींच्या ‘स्वाभिमानी’ला जाग, आता ‘एकला चलो’चा नारा?

आधी वादावादी नंतर कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर कामाबाबत समिती स्थापन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय?

कोल्हापूर विमानतळ धावपट्टी विस्तारणार कधी?