२९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? 

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र या राजकीय गदारोळानंतर सर्वसामान्य (elections) नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या एका अहवालामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत चर्चा रंगली आहे.

अहवालानुसार, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नाराजी टाळण्यासाठी इंधन दर काही काळ स्थिर ठेवण्यात आले होते. पण मतदान प्रक्रिया पूर्ण होताच आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींचा परिणाम देशांतर्गत दरांवर दिसू शकतो. इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 120 डॉलरच्या पुढे गेले असल्याने तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलमध्ये सुमारे 28 रुपये आणि डिझेलमध्ये 25 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याआधी 27 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात 10 रुपयांची कपात केली होती. या निर्णयामुळे तेल कंपन्यांना दर महिन्याला सुमारे 27 हजार कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी दरवाढ अपरिहार्य ठरू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे. जर ही वाढ प्रत्यक्षात झाली, तर मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोलचे दर 130 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. सध्या सुमारे 103 रुपयांवर असलेले पेट्रोल 128 ते 131 रुपयांदरम्यान पोहोचू शकते, तर डिझेलही 115 ते 118 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे महागाईचा आणखी फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, या अहवालानंतर सरकारने तातडीने स्पष्टीकरण देत सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध झालेले अंदाज दिशाभूल करणारे असल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने दरांमध्ये थेट वाढ केलेली नाही, असेही सरकारकडून नमूद करण्यात आले. तथापि, निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर प्रत्यक्षात काय निर्णय घेतला जातो, याकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. सरकार आपले आश्वासन पाळते की इंधन दरवाढीचा भार पुन्हा एकदा सर्वसामान्यांवर टाकला जातो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक

 27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?