शिंदेसेनेला मोठा धक्का ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द?

मुंबई महापालिकेतील उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याची घोषणा महापालिका प्रशासनाने बुधवारी केली. (Shiv Sena) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे यांनी १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवक पद संपुष्टात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिकेच्या जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सुलेखा चव्हाण या प्रभाग क्रमांक ५ (अ) मधून बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, (Shiv Sena) त्यांच्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तपासणी समितीसमोर प्रक्रिया सुरू होती. समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या नगरसेवक पदाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर १६ जून रोजीच्या समितीच्या आदेशाचा आधार घेत महापालिका प्रशासनाने त्यांचे पद रद्द झाल्याची अधिकृत कार्यवाही केली.

या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठविले आहे. या पत्रामध्ये १६ जून २०२६ पासूनच प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेवक पद रद्द झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेतील उबाठाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर आता ठाण्यात शिंदे सेनेच्या नगरसेविकेवरही पद गमावण्याची वेळ आली आहे. (Shiv Sena) त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर काही महिन्यांतच दोन्ही गटांतील नगरसेवकांच्या प्रमाणपत्रासंदर्भातील प्रकरणे चर्चेत आली आहेत.सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाल्याने प्रभाग क्रमांक ५ (अ) मध्ये राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. आता या रिक्त झालेल्या जागेवर पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया काय असेल, तसेच या प्रभागात पुन्हा निवडणूक होणार का, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांच्यावर तुरुंगात विष प्रयोग? राऊतांनी काय दिलं उत्तर?

एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या मंत्र्याला धक्का अधिकारात केली मोठी कपात?

कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलवर,पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले?