तुकाराम मुंढेंचा स्वतःच्याच विभागातील अधिकाऱ्यांना मोठा इशारा ‘तडजोड किंवा कामचुकारपणा केल्यास?

गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात मोठ्या कारवाया सुरू आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, गुटखा विक्रीवर छापे अशा अनेक कारवाया एफडीएकडून करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या तुकाराम मुंढे हे चांगलेच चर्चेत आहेत.

दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही तंबी दिली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील कामचुकार अधिकारी किंवा कर्मचारी आणि कारवाया करत असताना काही अधिकाऱ्यांकडून तडजोड करण्याचा प्रयत्न झाला का? किंवा होतो का? या पार्श्वभूमीवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपल्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. ते न्यूज 18 मराठी या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

कामचुकार किंवा कारवाई दरम्यान तडजोड करणाऱ्या एफडीएच्या अधिकाऱ्यांवरही काही दिवसांत कारवाईची टांगती तलवार असू शकते का? या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “काही दिवसांत म्हणण्यापेक्षा कधीही. जर कोणी कामचुकारपणा करत असेल किंवा कोणी काही तडजोड करताना दिसत असेल तर (Tukaram Mundhe) त्यांच्याबाबत सहानुभूती दाखवण्याचं काही करण नाही. चुकीचं काम करणं किंवा योग्य काम न करणं या दोन्हीमध्येही कारवाई होऊ शकते”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.

“एका कारवाईबाबत सर्व कॉर्डिनेशन थेट आयुक्त कार्यालयातून होत होतं. त्या अनुषंगाने तेथे सकाळी चार वाजता आमची टीम पोहोचली आणि मग आपण कारवाई केली. मात्र, ती कारवाई जेव्हा सुरू होती, तेव्हा तेथील स्थानिक अधिकाऱ्यांना देखील आम्ही जबाबदार धरणार आहोत. कारण त्यांच्या कार्यक्षेत्रात हे होत असताना तुम्ही त्याकडे का लक्ष दिलं नाही? त्यामुळे फूड बिझनेस ऑपरेटरबरोबरच जे ट्रान्सपोर्टर्स किंवा डिलर्स आहेत ते देखील यासाठी तेवढेच जबाबदार आहेत. (Tukaram Mundhe) तसेच आमच्या विभागात देखील कुठे चुका होत असतील तर त्याबाबत देखील कारवाई केली जाईल”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

लोकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तुम्ही कारवाया करत आहात. ही सगळी जबाबदारी एफडीए अधिकाऱ्यांवर आहे. मात्र, त्यातील काही जणांकडून काही तडजोड करण्याचा प्रयत्न झाला आहे का? किंवा होतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. (Tukaram Mundhe) यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “अशा काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यावर माझा व्हिजिलन्स सुरू आहे. काही अधिकाऱ्यांबाबतीत मी कारवाया प्रस्तावित केलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या कारणास्तव आहेत. डरेलिक्टन ऑफ ड्युटी ज्याला आपण म्हणतो, त्याबाबतीतील प्रस्ताव मी कारवाईसाठी पाठवलेले आहेत. बोनाफाईड मिस्टेक आपण समजू शकतो. एखादी गोष्ट चुकून झाली तर समजू शकतो. मात्र, तुम्ही एखादी गोष्ट जर मुद्दाम केलेली असेल तर कोणालाही माफ करण्याचा प्रश्न येत नाही. अशा प्रकरणावर कारवाई करण्याचा प्रस्ताव मी सादर केलेला आहे. तसेच अशा काही तक्रारी येतात, त्यावर आपल्या काही अधिकाऱ्यांकडून व्हिजिलन्स सुरू आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणांना देखील मी विनंती केलेली आहे की, तुमचा व्हिजिलन्स आमच्या विभागावर वाढवा. हे मी तोंडी बोललो आहे आणि लेखी देखील कळवलेलं आहे. जेणेकरून आपण चांगलं काम करत असताना त्याचा गैरफायदा आपल्याच विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचारी घेणार नाहीत ना? याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे आणि ते करण्याचा प्रयत्न मी करत आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलं.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?