ऊसदराची कोंडी कायम असतानाच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऊसदर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. ऊसदर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याच्या निषेधार्थ राजाराम साखर कारखान्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आला. तर कुरुंदवाड येथे कर्नाटकमध्ये साखर घेऊन जाणारा ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरला. ट्रकमधील साखर शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्नही करण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे साखर कारखानदारांसमोरील आव्हान वाढले आहे.

सांगली जिल्ह्यातील नांद्रे-खोतवाडी रस्त्यावर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. सर्वोदय साखर कारखान्याच्या राजारामबापू युनिट कारंदवाडीशी संबंधित ऊस वाहतुकीदरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. (sugarcane) तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम साखर कारखाना, बावडा यांच्याकडे जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरलाही आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे. ऊसदर जाहीर न करता कारखान्यांकडून ऊसतोड सुरू असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने संताप व्यक्त केला आहे. या घटनांमुळे ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ऊसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये मिळावी, (sugarcane) अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखानदारांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड सुरू करू नये, अशी संघटनेची भूमिका आहे. मात्र, दराचा तोडगा निघण्यापूर्वीच कारखान्यांकडून ऊसतोड सुरू झाल्याने आंदोलन तीव्र झाले आहे. आजपासून आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, कर्नाटकातील एका साखर कारखान्यातून ३० टनांहून अधिक साखर घेऊन मिरज रेल्वे स्थानकाकडे निघालेला ट्रक कुरुंदवाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवला. या साखरेची रेल्वेमार्गे दिल्लीला वाहतूक केली जाणार होती. माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पाच मैल परिसरापासून ट्रकचा पाठलाग केला. कुरुंदवाड येथे ट्रक थांबवून तपासणी केली असता (sugarcane) त्यामध्ये साखरेची पोती असल्याचे दिसून आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या.
ट्रकमधील साखरेची पोती खाली उतरवून शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला. मात्र, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत हा प्रयत्न रोखला. कार्यकर्त्यांना ट्रकवरून खाली उतरवून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आणि पोलिस ठाण्याकडे रवाना केला. या आंदोलनात बंडू उमडाळे, सचिन शिंदे, वर्धमान भबिरे, शिवाजी रोडे, प्रमोद चौगुले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अॅटम बॉम्ब मोठी खळबळ