गोकुळ अध्यक्षपदाचा तिढा सुटणार सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट मुश्रीफ, चंद्रकांतदादांशी चर्चा

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रातील राजकारण तापण्याची शक्यता असतानाच, आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांना सहकार्याचे आवाहन केले आहे.

लोकांचा कल समोर आला असून, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या नेत्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती आपण केल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच, आनंदराव पाटील चुयेकर यांच्या चिरंजीवांना अध्यक्ष करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (Kolhapur) त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय समीकरणे कशी आकार घेतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.सतेज पाटील म्हणाले, “मी मुश्रीफ साहेब, विनय कोरेजी, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी बोललो आहे. लोकांचा कल समोर आला आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी आपण उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी त्यांना विनंती केली आहे.”

प्रकाश आबिटकर आणि संजय मंडलिक यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगताना पाटील म्हणाले, “प्रकाश आबिटकर आणि संजय मंडलिक यांनी माझा फोन घेतला नाही. कदाचित ते कार्यक्रमात असतील. (Kolhapur) त्यामुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही. मात्र, इतर चार नेत्यांशी बोलून आम्ही निर्णय घेत आहोत.”महायुतीच्या काही संचालकांनी त्यांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची विनंती केल्यामुळे आपण संबंधित नेत्यांशी संपर्क साधल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. सर्वांनी समोपचाराने आपले संचालक पाठवून सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी आनंदराव पाटील चुयेकर यांच्या चिरंजीवांच्या नावाला सतेज पाटील यांनी पाठिंबा दर्शविला. “मागच्या वेळी त्यांना अध्यक्ष करण्याचे ठरले होते. मुश्रीफ साहेब आणि माझी त्यांना अध्यक्ष करण्याची इच्छा होती. विनय कोरे यांचीही तीच इच्छा होती. आम्हा तिघांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आबिटकर आणि मंडलिक यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे,” असे पाटील यांनी सांगितले.गोकुळमध्ये सतेज पाटील गटाचे संख्याबळ निर्णायक ठरले असले, तरी अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या भूमिकेला महत्त्व राहणार आहे. (Kolhapur) त्यामुळे पाटील यांच्या आवाहनाला महायुतीचे नेते कसा प्रतिसाद देतात आणि अध्यक्षपदाची निवड बिनविरोध होते की राजकीय संघर्षाला तोंड फुटते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : 

देवेंद्र फडणवीस यांचाही गेम होणार होता मनोज जरांगे यांचा आणखी एक अ‍ॅटम बॉम्ब मोठी खळबळ

खुशखबर पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार

संजय राऊत थेट राष्ट्रवादीला भिकारी म्हणाले अचानक हल्ला का