राज्यातील जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याच्या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने महाराष्ट्र परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी राज्यातील २७ प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (RTO) प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.

१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, या वाहनांपैकी ५० टक्क्यांहून अधिक वाहनांवर अद्याप नवीन नंबर प्लेट बसवण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील सुमारे २५ ते ३० आरटीओ कार्यालयांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी वाहनांवरच HSRP बसवण्यात आल्याचे परिवहन मंत्र्यांच्या आढावा बैठकीत समोर आले होते. ७ ऑक्टोबर रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जुन्या वाहनांवरील HSRP बसवण्याच्या कामाचा आढावा घेतला होता. यावेळी कामाच्या संथ गतीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. (installing) त्यानंतर परिवहन आयुक्तांनी २७ आरटीओ आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
वारंवार सूचना देऊनही कार्यालयांच्या कामगिरीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. (installing) त्यामुळे वरिष्ठ स्तरावर कामाच्या अंमलबजावणीत त्रुटी राहिल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कामावर प्रभावी नियंत्रण आणि देखरेख ठेवून निश्चित उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. सात दिवसांत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास नियमानुसार पुढील कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, HSRP नंबर प्लेट बसवण्याची जबाबदारी निविदा प्रक्रियेद्वारे रोसमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना देण्यात आली आहे. या कंपन्यांनी डिसेंबर २०२४ पासून जुन्या वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली.
HSRP नंबर प्लेटमध्ये अॅल्युमिनियम धातूचा वापर केला जातो. त्यावर प्रकाश परावर्तित करणारा थर, अशोक चक्राचे होलोग्राम, IND अक्षरे आणि लेझरने कोरलेला दहा अंकी विशिष्ट क्रमांक असतो. त्यामुळे या नंबर प्लेटमध्ये छेडछाड करणे किंवा बनावट प्लेट तयार करणे कठीण होते. या नंबर प्लेटसाठी दुचाकी आणि ट्रॅक्टरला जीएसटीसह ५३१ रुपये, तीनचाकी वाहनांना ५९० रुपये, तर चारचाकी आणि मोठ्या वाहनांना ८७९ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र, इतर राज्यांच्या तुलनेत शुल्क अधिक असल्याची भावना आणि अन्य कारणांमुळे वाहनधारकांकडून नंबर प्लेट बसवण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले जात आहे.
जून २०२६ मध्ये राज्य सरकारने ३० जूनच्या मुदतीनंतर HSRP न बसवणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा इशाराही दिला होता. (installing) तसेच HSRP नसलेल्या वाहनांना मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, हायपोथिकेशन नोंद, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओ सेवांवर मर्यादा आणण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता परिवहन विभागाने थेट २७ आरटीओ अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने HSRP बसवण्याच्या मोहिमेला वेग येणार का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर पुढील कोणती कारवाई होणार, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
कांदा खरेदी करताना या चुका टाळा अन्यथा पैशांचं होईल मोठं नुकसान
गुड न्यूज सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर