उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज (ता. ३) किणी टोलनाक्यावर बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात आले. हजारो शेतकऱ्यांनी टोलनाका बंद पाडत महामार्गावर ठिय्या मांडला आहे.(Shetkari) त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील उसदराची कोंडी अद्याप कायम आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही. (Shetkari) त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३ नोव्हेंबरपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी अकरापासून किणी टोलनाक्यावर आंदोलनाला सुरुवात झाली.
साखर प्रतिक्विंटल ४ हजार ७०० ते ५ हजार ६०० रुपये दराने विकली जात असताना उसाला ४ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्यास कारखानदारांची टाळाटाळ का, असा सवाल शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. पहिली उचल निश्चित झाल्याशिवाय उसाचे कांडकेही तोडू देणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
दुसरीकडे, साखर कारखानदार प्रतिटन ३ हजार ८०० रुपये आणि साखरेचे दर वाढल्यास आणखी २०० रुपये देण्याच्या प्रस्तावावर ठाम आहेत. पुणे आणि सांगली जिल्ह्यांतील कारखाने सुरू झाले असून, तेथे प्रत्येकी ६० हजार ते एक लाख टनांपर्यंत उसाचे गाळप झाले आहे. (Shetkari) त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे नुकसान टाळण्यासाठी कारखाने तातडीने सुरू करावेत, अशी भूमिका कारखानदारांच्या प्रतिनिधींनी मांडली आहे.
मात्र, कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चांगला असल्याने प्रतिटन ४ हजार ५०० रुपये दर कारखान्यांना परवडणारा आहे. हा दर मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. त्यामुळे ऊसदराचा तिढा आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड