इचलकरंजीतील दिवाळी बाजाराच्या परंपरेचा दीप मालवला थोरात चौकात नव्या बाजाराचा उदय

दिवाळी म्हटली की खरेदी आलीच. आणि इचलकरंजीकरांसाठी दिवाळी खरेदीचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर भरणारा पारंपारिक बाजार! गेली पन्नासहून अधिक वर्षे या रस्त्यावर इचलकरंजीकरांनी दिवाळी खरेदीची लयलूट अनुभवली आहे. कपडे, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, किल्ला, फळफुले, मिठाई, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानांनी हा रस्ता अक्षरशः फुलून जायचा. वस्त्रनगरीची दिवाळी याच रस्त्यावर साजरी व्हायची.

मात्र न्यायालयाच्या अतिक्रमणमुक्त रस्त्याच्या आदेशानंतर यंदा प्रथमच या ऐतिहासिक मार्गावरील दिवाळी बाजाराचा दीप मालवला आहे. हा निर्णय इचलकरंजीकरांसाठी जिव्हारी लागणारा असला तरी एका परंपरेचा अंत होत असतानाच दुसरीकडे कायदा पालनाच्या शिस्तीचे एक आगळेवेगळे दर्शन इचलकरंजीकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला घडवले आहे.

इचलकरंजी शहराच्या इतिहासात प्रथमच शिवतीर्थ ते गांधी पुतळा हा महत्त्वाचा मुख्य मार्ग सर्व व्यापारी, फेरीवाले, छोटे व्यावसायिक, नगरसेवक, सामाजिक संस्था आणि समस्त नागरिक (shopping) यांच्या बहुमोल सहकार्याने मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच या मोकळ्या आणि स्वच्छ रस्त्यावर इचलकरंजीकरांना वाहतूक कोंडी शिवाय दिवाळीचा उत्सव साजरा करण्याचा आनंद मिळणार आहे.

हा केवळ रस्ता मोकळा होण्याचा विषय नसून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेल्या सामूहिक इच्छाशक्तीचा आणि सकारात्मक बदलाचा विजय आहे, असे प्रतिपादन महापौर उदय धातुंडे यांनी मंगळवारी केले आहे. (shopping) त्यांनी या ऐतिहासिक कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व व्यापारी, फेरीवाले, छोटे व्यावसायिक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि समस्त नागरिकांचे आभार मानले आहेत. या उपक्रमासाठी आयुक्त पल्लवी पाटील, सर्व सभापती, नगरसेवक तसेच महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले आहे.

दिवाळी बाजाराचा उदय आता या जुन्या बाजाराच्या जागी आठवडी बाजार भरत असलेल्या लेफ्टनंट जनरल थोरात चौका जवळच दिवाळी बाजाराचा नवा थाट उद्यापासून पाहायला मिळणार असून त्या ठिकाणी सर्व फेरीवाल्यांना शिस्तबद्ध जागा देण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. (shopping) त्यामुळे एक परंपरा संपली असली तरी नव्या ठिकाणी नव्या उत्साहात दिवाळी बाजाराचा उदय होणार आहे. यापुढेही इचलकरंजी शहर स्वच्छ, सुंदर, अतिक्रमणमुक्त आणि विकसित करण्यासाठी एकत्र येऊया असे आवाहन महापौरांनी केले आहे.

हेही वाचा : 

स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली