संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे की, ते लोकशाही विरोधी मार्गाने गोकूळ दूध संघात चार संचालक नेमून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. सतेज पाटलांना मिळालेला जनादेश धुडकावून, गोकूळ संघ अमूलला विकण्याचा हा मोठा डाव असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे, ज्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रातील लोकशाही धोक्यात आली आहे.

गोकूळची सत्ता हातून गेल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. सतेज पाटलांच्या पारड्यात शेतकऱ्यांनी आपलं बळ दिलं आहे. असं असताना लोकशाहीचा कौल झुगारून गोकूळवर चार संचालक नेमण्याचा घाट घातला जात आहे. गोकूळ बळकावण्याचा हा डाव आहे, असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. (allegation) मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा आरोप करून सर्वांचीच झोप उडवून दिली आहे.
महाराष्ट्रातील लोकशाही सरकारमुळेच धोक्यात आली आहे. सत्ताधारीच लोकशाहीचे हत्यारे आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे गोकूळची निवडणूक आहे. सतेज पाटील यांच्या पॅनलने 25 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. सतेज पाटील यांना बहुमत मिळालं आहे. (allegation) त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष झाला पाहिजे होता. साडेपाच लाख दूध उत्पादकांनी त्यांना मतदान केलं आहे. त्यांना निवडून दिलं आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांसारखे लोकशाहीचे विरोधक बहुमताचा अनादर करून अध्यक्ष निवडू देत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
आता फडणवीस सरकार खास गोकूळसाठी नवीन कायदा आणत आहे. गोकूळमध्ये चार एक्सपर्ट संचालक घुसवून स्वत:चं बहुमत करून गोकूळ संघ ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा आहे. भाजपविरोधातील तिरस्कार हा असा निर्माण झाला आहे, हे अमित शाहांना मी सांगू इच्छितो. शाह सहकार मंत्रालयाचे प्रमुख आहेत. त्यांनी सहकार मंत्रालय या चोऱ्यामाऱ्यांसाठी घेतलं आहे. महाराष्ट्राच्या किंवा इतर राज्यातील सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गोकूळ हे अमूलला विकायचं आहे. तो डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला. सतेज पाटलांचे 13 संचालक निवडून आणले. विरोधकांनी दोन संचालक चोरले. नाही तर बहुमत 15 चं असतं, असं राऊत म्हणाले.
तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताना? मग एक मोर्चा गोकूळ वाचवण्यासाठी काढा. सतेज पाटलांचं बहुमत असतानाही तुम्ही चार ज्यादा संचालक गोकूळवर लादणार आहात. मुख्यमंत्री म्हणून अध्यादेश काढणार आहात. तुम्ही लोकशाहीच्या नावाने ही षंडगिरी करत आहात. संविधानाची हत्या सुरू आहे. शेतकऱ्यांनी केलेलं मतदान ठोकरून देत आहात. अराजकाचे सूत्रधार तुम्ही आहात. राज्यातील सर्व पक्ष एकत्र येतील आणि गोकूळच्या मागे उभे राहतील. शेतकऱ्यांची संघटना ताब्यात घेणार असाल तर तुम्हाला राज्यात राज्य करणं शक्य होणार नाही. बहुमताचा अनादर करणं ही लोकशाहीची हत्या आहे, असा हल्लाच त्यांनी चढवला.
शेतकऱ्यांना फक्त 5 हजार रुपये आर्थिक मदत केली जात आहे. त्यावरूनही त्यांनी टीका केली. अलिशान गाड्यातून कोण फिरतंय? मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे मंत्री काय रिक्षातून फिरत आहेत का? तोंडाला येईल ते बोलू नका. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात. पाच हजार रुपये ही तुटपूंजी मदत आहे. त्यामुळे विरोधक बोलणारच ना. तुम्ही विरोधी पक्षात असता तर तुम्ही पाच हजारवेळा रस्त्यावर उतरून तांडव केलं असतं. आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना राग येतो. लोकशाहीत राज्यकर्त्यांना राग येता कामा नये. (allegation) त्यांनी काही गोष्टी पूर्वाश्रमीच्या मुख्यमंत्र्यांकडून शिकलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
हेही वाचा :
स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम
कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड