राजू शेट्टींचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित १९ नोव्हेंबरला कारखानदारांसोबत निर्णायक बैठक

गाळप हंगामातील उसाला प्रतिटन ३,५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले ठिय्या आंदोलन सोमवारी मध्यरात्रीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. ऊसदराचा अंतिम तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड बंद ठेवावी, या आग्रही मागणीपुढे अखेर जिल्हा प्रशासनाने नमते घेतले आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदारांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीचे लेखी पत्र जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी येऊन शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले.

शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांना लेखी पत्र दिले आहे. (Raju Shetty) तसेच, जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमननाही स्वतंत्र आदेश बजावण्यात आले आहेत. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीस कारखानदारांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बैठकीस प्रतिनिधी किंवा व्यवस्थापकीय संचालकांना पाठवू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता अधिनियमातील कलम १६३ नुसार या बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, कारखानदारांनी मान्य केल्याप्रमाणे मंगळवारी (१७ नोव्हेंबर) सकाळी १० वाजेपर्यंत तोडणी झालेला ऊस गाळप करून १९ नोव्हेंबरपर्यंत सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड पूर्णपणे स्थगित करावी, असे आदेशही जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

सोमवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन सोलापुरात पाऊल ठेवले. चार हुतात्मा पुतळा येथून निघालेल्या मोर्चात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी तीन वाजल्यापासून सातरस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने सात रस्ता ते पत्रकार भवन चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

सुरुवातीला कारखानदार व प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारावरील पोलीस बंदोबस्त बाजूला सारून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाण मांडले. राजू शेट्टी यांनी शांतता व शिस्त पाळण्याचे आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी आणि कारखानदारांच्या विरोधात लोकगीते गात आंदोलन सुरू ठेवले. (Raju Shetty) रात्र झाल्यावर शेतकऱ्यांनी वर्गणी जमा करून रस्त्यावरच चुली मांडल्या आणि जेवणाची सोय केली. आसपासच्या गावांतून आणलेली चटणी-भाकरी, कांद्याची पात, मेथी-कोथिंबीर आणि काकडी असा बेत आखत राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावरच पंगत मांडली.

आंदोलनाची तीव्रता आणि रस्त्यावरील ठिय्या पाहता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याशी चर्चा करून गुरुवारी कारखानदारांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला. (Raju Shetty) रात्री एक वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह आंदोलनस्थळी दाखल झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे हेदेखील १९ नोव्हेंबरच्या बैठकीस उपस्थित राहून शेतकरी व कारखानदारांमध्ये तोडगा काढण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे प्रशासन आणि कारखानदारांना ठोस निर्णय घेण्यास भाग पाडले असून, आता गुरुवारच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

“जिल्हा प्रशासनाने ऊसतोड बंद ठेवण्याचे आणि कारखानदारांच्या बैठकीचे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, १९ नोव्हेंबरच्या बैठकीत उसाला ३,५०० रुपये पहिली उचल देण्याबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात