‘शक्तिपीठ’ मोजणीवरून शेतकरी-पोलिसांत धुमश्चक्री

प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन व मोजणी प्रक्रियेवरून मंगळवार, दि. २४ रोजी विटा परिसरात शेतकरी आणि पोलिस प्रशासनात प्रचंड संघर्ष पाहायला मिळाला. दिवसभर चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांनी गनिमीकाव्याने मोजणी अधिकाऱ्यांचे मशिन पळवून नेले. प्रशासनाचा मोजणीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. (farmers) यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे संघटक ॲड. दीपक लाड यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याने तणाव आणखी वाढला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व करत प्रशासन आणि पोलिसांना इशारा दिला.

शनिवारी ‘शक्तिपीठ’च्या मोजणीला झालेल्या विरोधानंतर मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा या मार्गाची मोजणी निर्धारित करण्यात आली होती. त्यासाठी पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली होती. शक्तिपीठ महामार्गासाठी विटा परिसरातील माहुली, भाग्यनगर, घानवड, हिंगणगादे आणि नागेवाडी या गावांत महसूल प्रशासनाकडून मोजणी होणार होती. (farmers) त्यासाठी पहाटेपासूनच विटा पोलिस ठाण्यासमोर पोलिसांच्या १५ ते २० मोठ्या व्हॅन आणि खासगी वाहनांतून मोठा फौजफाटा दाखल झाला होता. या बंदोबस्तामुळे परिसरात तणावाचे वातावरण होते. मोजणीला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी सकाळीच आंदोलनस्थळी दाखल झाले. रेवणसिद्ध पॉईंटवर शेट्टी यांच्यासह ॲड. दीपक लाड, बोरगावचे जितेंद्र पाटील आणि इतर शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक होऊन मोजणी रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आली. माहुली आणि भाग्यनगर पॉईंटवरही कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता.

सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकवेळा तीव्र झटापट झाली. प्रशासनाने खासगी वाहनातून मोजणीचे साहित्य व मशिन आणले होते; मात्र संधी साधत भाग्यनगर येथील काही आंदोलकांनी गनिमीकाव्याने मोजणी मशिन पळवून नेले. यामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, आंदोलनादरम्यान दीपक लाड यांना पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती पसरताच वातावरण अधिकच चिघळले; तसेच पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन दूरवर नेल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला.

माहुली येथील मोजणी पॉईंटवर माजी खासदार राजू शेट्टी, माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा, ॲड. दीपक लाड, श्रीदास होनमाने, राजकुमार माने यांच्यासह संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध करत त्यांनी मोजणी रोखण्याचा निर्धार व्यक्त केला. मोजणीला विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. अखेर प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी मोजणी मशिन पळवून नेणाऱ्यांवर दरोडा आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर काही वेळाने संबंधित मोजणी मशिन आंदोलकांनी प्रशासनाकडे परत केले.

प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार, तहसीलदार योगेश टोंपे, पोलिस निरीक्षक सुरेश साळुंखे आणि नायब तहसीलदार अभिजित हजारे आदी अधिकाऱ्यांनी सांगली व विटा पोलिसांच्या मदतीने दिवसभर मोजणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, राजू शेट्टी आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रतिकारामुळे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रशासनाला मोजणी करता आली नाही आणि प्रक्रिया अपूर्ण ठेवूनच प्रशासनाला परतावे लागले.

राजू शेट्टी हे राज्याच्या दौऱ्यावर असताना माहुली परिसरात मोजणी होणार असल्याची माहिती मिळताच त्यांनी दौऱ्यात बदल करून आंदोलनस्थळी धाव घेतली. ते रात्रीच भाग्यनगर परिसरात दाखल झाले. सकाळपासून प्रशासनाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. (farmers) दरम्यान, विटा येथून अतिरिक्त पोलिस फौज मागवण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शेट्टी दिवसभर माहुली येथील मोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून होते. एक इंचही जमीन देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

आंदोलनावेळी झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यानंतर मोठी पळापळ झाली. पोलिसांनी शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीचे संघटक ॲड. दीपक लाड यांना अंगावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. मारहाणीत ॲड. लाड यांच्या हाताची करंगळी फॅक्चर झाली. याची माहिती मिळताच आंदोलक आणखी आक्रमक झाले.

आंदोलनात महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आमच्या जमिनी घेऊ नका, अशी विनवणी करत काही महिलांनी पोलिसांच्या पाया पडून विरोध दर्शवला. पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त करत शेट्टी यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आम्ही काय काश्मीरच्या सीमेवर आलो आहोत का, आमची माणसे काय अतिरेकी किंवा नक्षलवादी आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, पहाटेपासून ताब्यात घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी करत महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : 

इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कृषिमंत्र्यांचा फायन्सास कंपन्यांना मोठा इशारा, थेट मुख्यमंत्रीच

नोकरभरतीचे पेपर फोडणाऱ्यांची आता खैर नाही सरकारने घेतला डेंजर निर्णय, आता थेट