बैलगाडा शर्यतीवेळी बैलाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

शिक्रापूर परिसरातील करंदी (ता. शिरूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान दुर्दैवी घटना घडली असून बैल पकडण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बैलाच्या धडकेत मृत्यू झाला. (tragic incident) प्रकाश महादू फटांगडे (वय ३५, रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

करंदी येथे गुरुवारी ‘करंदी केसरी २०२६’ या नावाने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा सुरू असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा अचानक अनियंत्रित झाला. वेगाने धावणारे बैल आवरण्यासाठी प्रकाश फटांगडे पुढे धावले. मात्र त्याचवेळी बैलाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले.

घटनेनंतर उपस्थितांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली. याप्रकरणी मृताचे भाऊ गोरक्ष महादू फटांगडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गावात यात्रा नसताना केवळ निवडणूक प्रचारासाठी ही शर्यत आयोजित करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. स्पर्धास्थळी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक तसेच पोलिस बंदोबस्त नसल्यानेच प्रकाश यांचा जीव गेल्याचा संताप कुटुंबीयांनी व्यक्त केला. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार