विज्ञानाच्या आधारानेच सुदृढ आणि निरोगी समाजाची निर्मिती होऊ शकते, असा संदेश देत येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या या दिनानिमित्त रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावर्षीच्या “आरोग्यासाठी एकत्र येऊया, विज्ञानासोबत उभे राहूया” या थीमनुसार आरोग्यविषयक जनजागृतीवर भर देण्यात आला. आधुनिक जीवनशैलीतील बदल, शहरीकरण, औद्योगिकीकरण, प्रदूषण आणि वाढती स्पर्धा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
रुग्णालयाचे शरीरविकृती शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी कोविड-१९ महामारीने आरोग्य व्यवस्थेतील उणिवा आणि संसाधनांची कमतरता अधोरेखित केल्याचे सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी कुलकर्णी यांनीही आरोग्य जागरूकतेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान रांगोळीच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक संदेश देण्यात आले. यावेळी अधिसेविका श्रीमती चारुशिल्पा येमल, सहाय्यक अधिसेविका श्रीमती सीमा कदम, विविध विभागातील परिचारिका, कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाह्यरुग्ण विभागाच्या परिचारिका श्रीमती चंदनशिवे यांनी केले.