कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : इस्रायल च्या बाजूने अमेरिकेने इराणविरुद्धच्या युद्धात (war) सक्रिय भाग घेतला. इराणच्या तीन ठिकाणच्या अण्वस्त्रतळावर जोरदार हल्ले केले. त्यानंतर संतापलेल्या इराणने इस्राईल आणि कतारवर जोरदार प्रतिहल्ले केले. युद्धाचा प्रचंड भडका उडून जग तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभा असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक शस्त्र संधी जाहीर करून जगाला चकित करून सोडले. पण तरीही इराणकडून इस्रायलवर जोरदार हल्ले सुरूच असल्यामुळे ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्र संधीबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. नंतर उशिरा इराण आणि इस्रायल या दोन देशांनी शस्त्र संधी मान्य केली असल्याचे जाहीर केले आहे.

मध्यपूर्वेत दीर्घकाळ चाललेल्या या युद्धात बाजी कोणी मारली यावर दावे प्रति दावे सुरू झाले आहेत आणि ते स्वाभाविक आहे. कारण आम्ही हरलो असे कोणीही म्हणणार नाही. जगाने बंदी घातलेली रासायनिक हत्यारे असल्याच्या संशयावरून अमेरिकेने काही वर्षांपूर्वी इराक मधील सद्दाम हुसेन यांची लष्करी कारवाई करून सत्ता उलथवून टाकली होती. इतकेच नव्हे तर शब्दांना फासावर लटकावले होते. प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पथकाला इराक मध्ये एकही रासायनिक हत्यार सापडले नव्हते. तथापि सद्दामला संपवण्यासाठी आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली तिथे राजवट आणण्यासाठी अमेरिकेने रासायनिक हत्यारांची निर्मिती करत असल्याचा ठपका ठेवून इराक वर हल्ला केला होता.
इराणचा”इराक”करायचा या उद्देशाने अमेरिका इस्रायल/इराण युद्धात उतरली होती. पण इराकच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक सामर्थ्यशाली इराण आहे. इराणकडे समृद्ध युरेनियम मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याचा उपयोग अण्वस्त्र निर्मितीसाठी केला जातोय असा संशय इस्राईलला आधीपासूनच होता आणि मध्यपूर्वेतील कोणत्याही इस्लामिक देशाकडे अण्वस्त्र असता कामा नये ही इस्रायलची प्रथमपासून ची भूमिका आहे आणि ती इस्रायलच्या सुरक्षिततेशी निगडित आहे.
अमेरिकेची सुद्धा अशाच प्रकारची भूमिका आहे आणि होती आणि म्हणूनच या युद्धात(war) उतरलेल्या अमेरिकेने इराणचे अण्वस्त्र स्थळ टार्गेट केले होते. ईराणचे तीन वेगवेगळ्या ठिकाणी अगदी खोलवर भूमी अंतर्गत अण्वस्त्र तळ आहेत. या तिन्ही ठिकाणी विशिष्ट प्रकारची (जी अन्य कोणत्याही राष्ट्राकडे नाहीत) आठ ते दहा क्षेपणास्त्रे अमेरिकेने त्यांच्या कतार येथील हवाई तळावरून टाकली.
हे तळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत किंवा नाहीत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण नेमक्या ठिकाणी ही क्षेपणास्त्रे पडली आहेत हे नक्की आणि त्यामुळेच या अणवस्त्र प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचविण्यात यश आले आहे, आपले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे असे समजून डोनाल्ड ट्रम्प यांनी कतारच्या माध्यमातून इराणशी संपर्क साधल्याचे सांगून एकतर्फी शस्त्र संधी जाहीर केली. विशेष म्हणजे आण्विक तळावर हल्ले केल्यानंतर ट्रम्प यांनी ईराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते.
तसे झाले नाही तर इराणला बेचीराख करू अशी धमकी दिली होती. युद्ध तुम्ही सुरू केले आहे आणि त्याचा शेवट आम्ही करू अशी उलट धमकी देऊन खोमेनी यांनी ट्रम्प यांना धुडकावून लावले होते. या एकूण पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी शस्त्रसंधी जाहीर करून जगाला आश्वासित आणि चकित केले आहे. एकीकडे ट्रम्प यांनी शस्त्र संधी झाल्याचे सांगितले आहे तर दुसरीकडे इराणकडून इस्रायलच्या तेल अविव या शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा सुरू केला आहे. याचाच अर्थ असा होतो की, इराणला शस्त्र संधी मान्य नाही. पण त्याचबरोबर इस्रायल ने सुद्धा शस्त्रसंधी मान्य केलेली नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अघोषित युद्धात(war) आपण मध्यस्थी केली आणि म्हणूनच या दोन देशात शस्त्र संधी झाली असा दावा ट्रम्प यांनी केला होता, पण तो मागे घेऊन पुन्हा केला होता. तेव्हाही भारताने आमचे ऑपरेशन सिंदूर हे संपलेले नाही. हे सांगून ट्रम्प महाशयांना योग्य तो संदेश दिला होता. भारत पाकिस्तान दरम्यानच्या शस्त्र संधीबद्दल यु टर्न घेणारे ट्रम्प हे अतिशय लहरी असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.

इस्रायल विरुद्ध इराण यांच्या युद्धात इस्रायलच्या बाजूने उतरायचे किंवा नाही याचा निर्णय दोन आठवड्यात घेऊ असे जाहीर करणाऱ्या ट्रम्प महाशयांनी अवघ्या काही तासात इराणच्या आण्विक तळावर हल्ला केला होता. खोमेनी यांनी शरण यावे, अमेरिकेसमोर गुडघे टेकावेत अन्यथा विनाशाला सामोरे जा असा इशारा देणारे ट्रम्प हे अचानक शस्त्रसंधी जाहीर करतात. इस्रायल आपल्या शब्दाच्या बाहेर नाही आणि घाबरलेला इराण शरण येईल अशा समजतीत ट्रम्प होते. पण त्यांचा हा समज नव्हे गैरसमज आहे हे इराण आणि इस्रायल या दोघांनीही काही तास युद्ध तसेच सुरू ठेवून स्पष्ट केले होते.
इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात अमेरिका उतरल्यानंतर रशिया, चीन, उत्तर कोरिया या अण्वस्त्रधारी देशांनी, प्रसंगी आम्ही इराणच्या सोबत युद्धात उतरू अशी अप्रत्यक्ष धमकी दिली होती. त्यामुळे जग हे तिसऱ्या महायुद्धाच्या(war) दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र समोर आले होते. अशावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या स्वभावाला साजेल अशी शस्त्रसंधी जाहीर केली. त्यांची ही भूमिका अनाकलनीय आहे आणि इसराइल ला सुद्धा ती न समजणारी अशीच आहे.
ईराणकडून त्यांचे आण्विक तळ सुरक्षित आहेत, असे सांगितले जात असले तरी त्याचे अतोनात नुकसान झाले आहे आणि ते न भरून येणार आहे आणि म्हणूनच त्याचा बदला घेण्याच्या निर्धाराने इराण कडून जोरदार प्रतिहल्ले सुरू आहेत. असे युद्ध विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकेने या युद्धातून आपले अंग काढून घेतले असले तरी तिसऱ्या महायुद्धाचा जगासमोरचा धोका कमी झालेला नाही अशी सध्याची स्थिती आहे. कारण शस्त्र संधीचे उल्लंघन केव्हाही होऊ शकते. कारण या इस्रायल, इराण आणि अमेरिका यांना जे साध्य करावयाचे होते ते झालेले नाही.
हेही वाचा :
श्री चौंडेश्वरी मुखवटा उत्सवात भजनसेवेत मान्यवर तल्लीन – भक्तिभावात रंगलेले क्षण