अमेरिका आणि चीनमधील वाढती जवळीक आणि नुकत्याच झालेल्या व्यापारी कराराच्या पार्श्वभूमीवर, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Trump) यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका लवकरच भारतासोबतही एक ‘मोठा व्यापार करार’ करणार आहे, ज्यामुळे भारत-अमेरिका आर्थिक संबंधात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

ही घोषणा ट्रम्प(Trump)यांनी त्यांच्या ‘बिग ब्युटीफुल डील’ या कार्यक्रमात बोलताना केली. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणावर भाष्य करत, “प्रत्येक देश आमच्यासोबत व्यापार करायचा इच्छुक आहे,” असे सांगितले. त्यांनी यासह स्पष्ट केले की, “सर्वांशी करार केला जाणार नाही. जे आमच्या अटी स्वीकारतील, त्यांच्याशीच व्यापार केला जाईल.”
गेल्या काही महिन्यांपासून तणावपूर्ण असलेल्या अमेरिका-चीन संबंधांमध्ये एका महत्त्वाच्या टप्प्यावर नवीन व्यापार करार झाला आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “कालच चीनसोबत करार झाला, आणि पुढील काही दिवसांत भारतासोबतही तो होऊ शकतो. भारतासोबत आमचे संबंध चांगले आहेत आणि व्यापार करारासाठी योग्य वेळ आली आहे.”
ट्रम्प(Trump) यांच्या या विधानामुळे भारतात उत्सुकता वाढली आहे. भारताने यापूर्वी अमेरिकेने काही वस्तूंवर लावलेल्या २६ टक्के करावर तीव्र आक्षेप घेतला होता, आणि हे कर हटवावेत, अशी मागणी केली होती. अमेरिका-भारत व्यापार करार अंतिम होताना याच मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि अमेरिका ९ जुलैपूर्वी हा करार अंतिम करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. हा करार झाला, तर दोन्ही देशांतील आयात-निर्यातीचा प्रवाह सुलभ होईल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही दोन्ही देशांमध्ये गुंतवणुकीचा मार्ग मोकळा होईल.
ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केले की, अमेरिका सर्व देशांशी व्यापार करार करणार नाही. “जे देश अमेरिकेसोबत प्रामाणिक व्यवहार करतील, त्यांच्याशीच करार होईल,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी यावेळी अशा देशांना २५, ३५ किंवा ४५ टक्के टॅरिफ लावण्याचा इशाराही दिला. त्यांचे हे धोरण ‘अमेरिका फर्स्ट’ या त्यांच्या मूलभूत धोरणाशी सुसंगत आहे. ट्रम्प यांच्या या भूमिका स्पष्ट करतात की, व्यापारी करार फक्त राजनैतिक मैत्रीवर नव्हे, तर आर्थिक व्यवहारिकतेवर आधारले जातील.

भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक याबाबतीत सहकार्य वाढत आहे. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील आगामी धोरणांमुळे भारत-अमेरिका व्यापारसंबंधात नवे पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. विशेषतः चीनसोबत झालेल्या करारानंतर ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख करून दिलेला संदेश हे सूचित करतो की, अमेरिका आशियामध्ये भारताला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार म्हणून पाहत आहे.
ट्रम्प(Trump) यांच्या घोषणेनंतर जागतिक व्यापारी समीकरणात भारताचे स्थान अधिक महत्त्वाचे होणार आहे. चीन आणि अमेरिकेमधील करारानंतर भारतासोबत होणारा करार आंतरराष्ट्रीय व्यापारात भारतासाठी मोठी संधी ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता ९ जुलैच्या आधी होणाऱ्या घडामोडीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा अडचणीत
आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत पुन्हा झाली घसरण
ठाकरेंच्या आंदोलनात सहभागी होणार? शरद पवार म्हटले, कोणीही सांगेल तुम्ही सहभागी व्हा…