भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर आणि क्रिकेटपटू(Cricketer) मनोज तिवारी हे दोघेही अगदी पूर्वीपासून एकमेकांना ओळखतात. इंडियन प्रिमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासाठी खेळताना एकच ड्रेसिंग रुम शेअर करण्यापासून ते 2015 मध्ये रणजी चषक स्पर्धेतील सामन्यात झालेल्या वादापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हे दोघेही कधी एकत्र होते तर कधी आणने-सामने!
सध्या बॉर्डर गावसकर चषक 1-3 ने गमावल्याने गंभीरवर चहुबाजूने टीका होत आहे. भारताने आपल्या मागील 8 कसोटींपैकी सहा कसोटी गमावल्या आहेत. त्यामुळेच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधूनही बाहेर पडला आहे.
याच मुद्द्यावरुन पश्चिम बंगालमधील स्थानिक क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटपटू(Cricketer) असलेल्या मनोज तिवारीने मागील आठ कसोटींमधील निकालच सर्व काही सांगून जात असल्याचं म्हणत गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. गौतम गंभीरला अजून बऱ्याच गोष्टी शिकायच्या असल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे. गंभीर कर्णधार झाल्यापासून भारताला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये पराभव झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने भारतीय मैदानांवर भारताला कसोटी मालिकेत हारवलं.
नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेत 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. “तुमच्या छोट्याश्या कार्यकाळात संघ तीन मालिका गमावत असेल तर हा मोठा पराभव आहे. यापूर्वी असं कधीही झालेलं नाही. निकालच सारं काही सांगत आहेत. भारतातच न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव तर न स्वीकरता येण्यासारखा आहे,” असं तिवारीने ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना म्हटलं आहे
“खेळात जय-पराजय होत राहतात. मात्र या पराभवाची कारणं काय आहेत हे प्रशिक्षक म्हणून शोधलं पाहिजे. काही गोष्टी आहेत तशाच चालू ठेवून चालणार नाही, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुमच्याकडून अपेक्षित असणारे निकाल तुम्हाला का देता आले नाहीत? राहुल द्रविडकडून तुम्ही धुरा स्वीकारली तेव्हा द्रविडने संघ एका उंचीवर नेऊन ठेवला होता. मात्र तिथून गोष्टी हव्या तशा पुढे गेल्या नाहीत. हे निव्वळ प्रशिक्षक अनुभवी नसल्याने झालं आहे,” असंही तिवारीने म्हटलंय.
गंभीरबद्दल बोलताना तिवारीने 2015 च्या रणजी सामन्यामध्ये त्याच्याबरोबर झालेल्या वादावरही भाष्य केलं. गंभीरने माझ्या कुटुंबाबद्दल वाईट शब्द वापरले होते असा दावा तिवारीने केला आहे. तसेच गंभीर सौरव गांगुलीबद्दलही वाईट बोलल्याचं तिवाराने म्हटलं आहे. “दिल्लीतील रणजी सामन्यात तो माझ्यासोबत भांडला होता तेव्हा प्रत्येकाने गंभीरच्या तोंडून आलेला प्रत्येक शब्द ऐकला होता. त्यामध्ये त्याने सौरव गांगुलीबद्दल वापरलेले अपशब्द आणि माझ्या कुटुंबाला दिलेल्या शिव्याही होत्या.
मात्र त्याला काही लोकांचं संरक्षण होतं. अशाच पद्धतीने पीआर (जाहिरातबाजी) काम करते. खेळाडू निवडणे आणि त्यांना अंतिम 11 मध्ये खेळवणे योग्य पद्धतीने होत नाहीये. हर्षित राणासाठी आकाश दीपला ड्र्रॉप केलं. जर हर्षित चांगला होता तर त्याला पुढील कसोटीत का खेळवलं नाही? आकाश दीपचं म्हणणं ऐकून घेतलं का? की तो यावर बोलूच शकत नाही का?” असा सवाल तिवारीने विचारला आहे.
हेही वाचा :
पुलीस और कानूनसे यहॉ, डरना मना है…!
लाडक्या बहिणी अन् दीदींना केंद्राकडून मिळेल ओवाळणी, अर्थमंत्री तिजोरी उघडणार!
ट्रम्प यांना अटक होणार का? सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला