आधार कार्डधारकांसाठी पत्ता बदलण्याची प्रक्रिया (proof of address) आता अधिक सोपी झाली आहे. पत्त्याच्या पुराव्याची कटकट टाळण्यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर पत्त्याचा पुरावा नाही, त्यांनाही आता सहजपणे आधारमधील पत्ता अपडेट करता येणार आहे.

या नव्या सुविधेनुसार, आधारधारक कुटुंबप्रमुखाच्या (Head of Family – HoF) संमतीच्या आधारे आपला पत्ता बदलू शकतात. विशेषतः मुले, पती-पत्नी किंवा पालक यांच्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. यासाठी अर्जदाराने कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते सिद्ध करणारे दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये रेशन कार्ड, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट किंवा गुणपत्रिका यांसारखी कागदपत्रे ग्राह्य धरली जातात.
पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, अर्जदाराने माय आधार पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरायची असते. त्यानंतर कुटुंबप्रमुखाच्या आधार क्रमांकाचा वापर करून विनंती सबमिट केली जाते. अर्ज पूर्ण झाल्यानंतर कुटुंबप्रमुखाला एसएमएसद्वारे सूचना पाठवली जाते आणि त्यांनी 30 दिवसांच्या आत लॉग इन करून ही विनंती मंजूर करणे गरजेचे असते.
जर कुटुंबप्रमुखाने ठरलेल्या कालावधीत विनंती मंजूर केली नाही किंवा नाकारली, तर अर्ज आपोआप रद्द होतो. अशा वेळी भरलेले शुल्क परत मिळत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
लोकांचे स्थलांतर वाढत असताना आणि अनेकांकडे स्वतःच्या नावावर पत्त्याचा पुरावा नसताना, UIDAI ची ही सुविधा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना दिलासा देणारी ठरणार आहे.
हेही वाचा
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार
इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय