देशातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांपैकी एक असलेल्या पेटीएम (Paytm) ने रोजगाराच्या दृष्टीने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने येत्या काही महिन्यांत हजारो नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. मर्चंट नेटवर्कचा विस्तार आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवांचा विकास हे या भरतीमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

मार्च 2027 पर्यंत भरती मोहीम कंपनीच्या माहितीनुसार, मार्च 2027 पर्यंत टप्प्याटप्प्याने सुमारे 4,000 नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. मागील दोन महिन्यांतच 800 हून अधिक उमेदवारांना कंपनीत संधी देण्यात आली असून आता पुढील भरती प्रक्रियेलाही वेग देण्यात आला आहे. उत्पादन विकास, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विभागांमध्ये नव्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.पेटीएमचे म्हणणे आहे की, व्यापारी नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी आणि एआय-आधारित सेवांचा विस्तार करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सध्या कंपनीमध्ये सुमारे 40 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. नव्या भरतीनंतर कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत जवळपास 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Paytm) त्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
कामगिरीच्या आधारे 400 कर्मचाऱ्यांवर गंडांतर एका बाजूला कंपनी मोठ्या प्रमाणात भरती करत असली तरी दुसऱ्या बाजूला कामगिरीचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. परफॉर्मन्स अप्रेजल सायकलनंतर एकूण कर्मचारी संख्येच्या सुमारे 1 टक्के म्हणजे जवळपास 400 कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. (Paytm) त्यामुळे भरतीसोबतच कामगिरीवरही कंपनीचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.दरम्यान, पेटीएमने अलीकडील सलग चार तिमाहींमध्ये नफा नोंदवला आहे. विविध नियामक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना केल्यानंतर कंपनीने आपल्या व्यवसायात अनेक बदल केले आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा हे कर्ज, गुंतवणूक आणि इतर आर्थिक सेवांच्या माध्यमातून ग्राहकांशी अधिक मजबूत नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2010 मध्ये सुरू झालेली ही कंपनी सुरुवातीला मोबाईल रिचार्ज सेवा पुरवत होती. त्यानंतर डिजिटल पेमेंट्स, आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात विस्तार करत आज ती देशातील प्रमुख फिनटेक कंपन्यांपैकी एक बनली आहे.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी