कामानिमित्त दुचाकीवरून जाताना पळशिवणेतील दोघांवर काळाचा घाला

गंगापूर-पळशिवणे मार्गावरील धोकादायक वळणावर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात पळशिवणे येथील अंगणवाडी सेविका सुनीता ज्योतिराम पोवार (वय ५०) आणि शामराव तुकाराम चव्हाण (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. कामानिमित्त मडिलगे बुद्रुक येथे जाताना दोघांवर काळाने घाला घातला. या अपघातात ज्योतिराम चिनो पोवार (वय ५५) हे गंभीर जखमी झाले (Palshivane) असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद भुदरगड पोलिस ठाण्यात झाली आहे.मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सुनीता पोवार, ज्योतिराम पोवार आणि शामराव चव्हाण हे कामानिमित्त मडिलगे बुद्रुक येथे दुचाकीवरून निघाले होते. गंगापूर-पळशिवणेदरम्यानच्या तीव्र वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन घसरले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडावर दोघे जोरात आदळले.

या अपघातात सुनीता पोवार आणि शामराव चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. (Palshivane) यामध्ये दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ज्योतिराम पोवार गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या दुर्दैवी घटनेमुळे पळशिवणे गावासह परिसरात शोककळा पसरली असून अंगणवाडी सेविका सुनीता पोवार यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.गंगापूर-पळशिवणे मार्गावरील वळणावर झालेल्या या अपघाताने पळशिवणे गाव हादरले आहे. कामानिमित्त निघालेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे अंगणवाडी सेविका सुनिता पवार या गावात सामाजिक कार्यात सक्रिय होत्या.

हेही वाचा :

तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी

SBI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

गरज नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करा