छ. शिवरायांच्या रायगडाव मूलभूत सुविधांची वानवा..!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

येत्या शनिवार दिनांक 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन किल्ले रायगड येथे अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला जाईल. त्याची पूर्वतयारीसध्या जोरात सुरू आहे. छत्रपती शिवरायांना आणि त्यांच्या महापराक्रमाला अभिवादन करण्यासाठी हजारो शिवप्रेमी राजधानी रायगड येथे दरवर्षीप्रमाणेच यंदाही उपस्थित राहतील. पण राज्याभिषेक दिनाशिवाय इतर दिवशी रोजच शेकडो शिवप्रेमी, इतिहास प्रेमी किल्ले रायगड येथे येत असतात पण किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरणाच्या वतीने तेथे किमान मूलभूत सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेलेल्या नाहीत. मग गेल्या नऊ वर्षात प्राधिकरणाने पायाभूत सुविधांवर नेमका किती खर्च केला याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होते.स्वराज्याच्या राजधानीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय विचारपूर्वक रायगडची निवड केली होती. हा गड अतिशय भक्कम आणि सुरक्षित असला पाहिजे, (Raigad) अशा सूचना छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधकाम तज्ञ हिरोजी इंदुलकर यांच्यावर रायगड बांधणीची जबाबदारी सोपवली होती. मुख्य राजवाडा, राण्यांचे महाल, तटबंदी, परकीय वकिलांसाठी निवासस्थान, बाजारपेठ, अशी सुमारे 350 बांधकामे हिरोजी इंदुलकर यांनी रायगडावर बांधली होती. विशेषतः या किल्ल्याची बांधणी करताना सार्वजनिक स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले होते. स्वच्छता गृहाची बांधणी केली होती. रायगडावर राहणाऱ्या रयतेसाठी प्राथमिक सुविधा उत्तमरीत्या तयार करण्यात आल्या होत्या. आजही इतक्या वर्षानंतर हिरोजी इंदुलकर यांच्या वास्तुस्थापत्य शास्त्राचा अभिमानाने उल्लेख केला जातो.

इसवी सन 2017 मध्ये कोल्हापूरचे युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या आग्रहावरून, मागणीवरून किल्ले रायगड संवर्धन प्राधिकरणाची स्थापना केली गेली होती आणि या प्राधिकरणाला 603 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आता नऊ वर्षानंतर हा निधी कुठे आणि कसा खर्च केला याची माहिती प्राधिकरणाने सार्वजनिक करणे आवश्यक आहे. राज्याभिषेक दिनी हजारो शिवप्रेमी रायगडावर हजेरी लावत असतात. पण इतर दिवशीही रोज असंख्य शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमी रायगडवर जात असतात. गेल्या काही वर्षांपासून किल्ले रायगडला महिला सुद्धा मोठ्या संख्येने जात असतात. किल्ले रायगड वर गेलेला शिवप्रेमी हा किमान तिथे काही तास घालवत असतो. इतिहासाची मनामध्ये उजळणी करत असतो. छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होत असतो. शिवप्रतिष्ठानचे रोज दोन कार्यकर्ते अर्थात धारकरी हे रायगडावर जाऊन समाधीवर पुष्पमाला चढवत असतात. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत असतात. युवराज संभाजी राजे छत्रपती तसेच शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांच्यामुळे रायगड किल्ल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पण त्यांच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा प्राधिकरणाकडून उपलब्ध करून दिलेल्या आहेत असे ठामपणे म्हणता येणार हिरोजी इंदुलकर यांनी रायगडावर स्वच्छता गृहाची त्या काळात बांधणी केली होती. (Raigad) सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था केली होती. आजच्या घडीला मात्र किल्ले रायगड येथे सार्वजनिक स्वच्छता गृहे उपलब्ध नाहीत. जी आहेत ती वापरता येत नाहीत इतकी त्यांची दुर्दशा झालेली आहे. रायगडावर रोज जाणाऱ्या शिवप्रेमी मध्ये महिलांची संख्याही लक्षणीय असते. किमान त्यांच्यासाठी स्वच्छता गृहाची उभारणी प्राधिकरणाने करणे आवश्यक होते आणि आहे.

गडावर येणाऱ्या शिवप्रेमींकडून प्राधिकरणाच्या वतीने प्रवेश शुल्क (25 रुपये) घेतले जाते. गडावर येणाऱ्या महिला या चार ते पाच तास उपाशी राहू शकतात पण वॉश रुमच नसेल तर त्यांची अडचण किती होईल किंवा होऊ शकते याचा विचारच प्राधिकरणाने केलेला दिसत नाही. याबद्दल तक्रार केली तर ते म्हणतात, आम्ही काही करू शकत नाही. रायगडावर स्वच्छतागृहे, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा, व इतर सोयी उपलब्ध करून देणे प्राधिकरणावर बंधनकारक आहे. आम्ही फक्त रायगड किल्ल्याचे संवर्धन करत आहोत, डागडुजी करत आहोत, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्यावर नाही अशी भूमिका प्राधिकरणाकडून घेतली जाते. तर मग पुरातत्त्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित होतो. पुरातत्त्व विभागाच्या परवानगीशिवाय रायगड किल्ल्यावर एक साधा खिळा सुद्धा ठोकता येत नाही, किंवा इकडचा दगड तिकडे करता येत नाही, (Raigad) त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता गृह बांधण्याची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडेच आहे.किल्ले रायगड बांधण्याची जबाबदारी असणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांनी रयतेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध दिल्या होत्या. छत्रपती शिवरायांनी तर स्त्रियांची प्रतिष्ठा जपली होती. आज रोज रायगडावर येणाऱ्या महिलांचा आत्मसन्मान अबाधित ठेवण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गृहाची नितांत आवश्यकता आहे.


हेही वाचा :

‘तर थेट कारवाई करू’ महाविद्यालयांना मोठा झटका

भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, VIDEO द्वारे व्यक्त केली नाराजी

“आता रम्मी नाही तर आता तीन पत्ती खेळ सत्ताधारी कलंकित मंत्र्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा ‘आक्रोश’