मुख्य निवडणूक आयुक्त संशयाच्या भोवऱ्यात?

केंद्रीय निवडणूक आयोग संशयातीत म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वाद विवादापासून, मतभेदापासून दूर असला पाहिजे. आयोगाच्या कामकाजाबद्दल सामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचा संशय आला नसला पाहिजे असे संकेत आहेत आणि कालपर्यंत हा आयोग संकेताच्या पलीकडे गेलेला नव्हता.(Election) पण आयोगामधीलच इतर दोन आयुक्तांनी वेगळ्या प्रकारची टीका टिपणी केल्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत आणि हे निकोप लोकशाहीसाठी चांगले नाही.

एन डी ए मधील घटक पक्ष वगळता विरोधी इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून गेल्या काही वर्षांपासून भारतीय निवडणूक आयोगाला रडारवर घेतले जात आहे. आयोगाच्या कार्यपद्धतीबद्दल आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी वेळोवेळीआक्षेप घेतले आहेत, हरकती घेतल्या आहेत. रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. मतदान यंत्राबद्दल ची तक्रार कायमची आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिल्यानंतर आयोगाबद्दल ते पक्षपाती आहे असा गंभीर आरोप करण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसबद्दल घेतलेला निर्णय येईल वादात सापडला आहे. अशा एकूण पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्यावर त्यांचेच सहकारी असलेले सुखविंदर संधू आणि विवेक जोशी या दोन सहकारी आयुक्तांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. हे आरोप बाहेरून कोणी केलेले नाहीत, तर त्यांच्याच सहकाऱ्यांनी केले असल्यामुळे गांभीर्य वाढले आहे. निकोप लोकशाही ची मुख्य जबाबदारी असलेला निवडणूक आयोगच संशयाच्या भोवऱ्यात येणे हे चिंताजनक आहे.

ज्ञानेश कुमार यांची 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी निवड करण्यात आली. (Election) त्यासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. पूर्वी नियुक्ती केली जायची. त्यांच्या पूर्वी मुख्य आयुक्त किंवा निवडणूक आयोग यांच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रारी केल्या जायच्या पण त्या विरोधी पक्षीय नेत्यांच्याकडून. त्यांच्या तक्रारीकडे राजकीय भूमिकेत सर्वसामान्य माणूस पाहत असे. कारण भारतीय निवडणूक आयोगावर सर्वसामान्य मतदारांचा आणि जनतेचा विश्वास होता. पण आता सुखविंदर संधू आणि विवेक जोशी या दोन सहकारी आयुक्तांनी मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बद्दल पहिल्यांदाच टीका टिपणी केल्याचे समोर आले आहे आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या हातामध्ये सरकारच्या विरोधात एक नवा मुद्दा मिळाला आहे.

गेल्या वर्षभरात निवडणूक आयोगाने जे काही निर्णय घेतले आहेत त्याबद्दल इतर दोन आयुक्तांनी जवळपास 14 आक्षेप घेतले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा अर्थ निवडणुका आयोगाने घेतलेले निर्णय हे सर्व संमतीचे अर्थात एकमताने घेतले होते असे म्हणता येणार नाही.मतदाराच्या संदर्भातील फॉर्म सहाबद्दल संधू आणि जोशी या दोघांनी घेतलेले आक्षेप ज्ञानेश कुमार यांनी फेटाळून लावले , निवडणूक आयोगावर आयटी संस्थेचा हस्तक्षेप प्रमाणाबाहेर वाढत चालला आहे याबद्दल या दोघांनी व्यक्त केलेली नाराजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी बेदखल केली आहे. म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, तसेच महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी ज्या तक्रारी नोंदवल्या होत्या त्याच्या जवळपास जाणारे आक्षेप दोन अतिरिक्त निवडणूक आयुक्तांनी घेतलेले दिसतात. आणि म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगांवर विरोधकांच्याकडून केलेल्या तक्रारी मध्ये
बरेचसे तथ्य आहे असे कोणीही म्हणेल.

निवडणूक आयोगामधील मतभेद बाहेर आल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यांनी तो विषय आता लावून धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी तर पुन्हा निवडणुका घ्या आणि मतदान बॅलेट पेपरवर घ्या असे म्हटले आहे. तर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी भारतीय लोकशाही आता निकोप राहिलेली नाही असे म्हटले आहे.निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण संजय राऊत म्हणतात की हा आयोग केंद्रीय गृह मंत्रालयाच्या हुकूमतीखाली आहे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जसे सांगतात तसा कारभार पाहतात असा गंभीर आरोप केला आहे.श्री ज्ञानेश कुमार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेबद्दल तातडीने खुलासा केला आहे. आयोगामध्ये वैचारिक मतभेद आहेत मात्र वाद कोणत्याही प्रकारचे नाहीत असे म्हटले आहे. आत्तापर्यंत घेतलेले सर्व निर्णय हे सहमतीचे आहेत असा त्यांनी केलेल्या दावा सहज विश्वास ठेवावा असा नाही. कारण त्यांचेच सहकारी असलेल्या दोन आयुक्तांनी त्यांच्या विरोधी आक्षेप नोंदवलेले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त हे आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतात आणि जाहीरही करतात.

गेल्या दहा महिन्यात आम्ही 14 आक्षेप नोंदवले आहेत आणि ते सर्व मतदारांशी संबंधित आहेत असे त्यांनी स्पष्ट केल्यामुळे ज्ञानेश कुमार (Election) यांच्या कार्यपद्धतीबद्दल कोणालाही संशय यावा. सध्याचा निवडणूक आयोग हा 26 वा आहे. आणि प्रथमच आयोगातीलच मतभेद बाहेर पडले आहेत आणि आता त्यावर उलट सुलट चर्चा सुरू आहे.भारतीय लोकशाही बद्दल संपूर्ण जगामध्ये आदर व्यक्त केला जातो. प्रचंड लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया ही शांततापूर्ण वातावरणात पार पडते याबद्दल अनेक देश आश्चर्य व्यक्त करत असतात. अर्थात त्याचे सर्व श्रेय भारताच्या निवडणूक आयोगाला आहे. पण हा आयोग सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला असल्यामुळे लोकशाही बद्दल चिंता व्यक्त होणे हे स्वाभाविक आहे.

हेही वाचा : 

गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? 

जोतिबा परिसर बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाला येणार गती?

कृष्णेत मिसळते दररोज ६.८० कोटी लिटर दूषित पाणी?