मुलीवर अत्याचार करून हत्या, इतरांना सावध करण्यासाठी वडिलांचा पथनाट्यातून जागर नसरापूर प्रकरण अजून किती

“तू तिथे का गेलीस? नक्की कोणाबरोबर होतीस? तुझे कपडे कसे होते? आता तुझ्याशी लग्न कोण करणार?” बलात्कार पीडित मुलीवर असा प्रश्नांचा मारा होतो. ती निराश, हताश होऊन म्हणते “…माझ्यावर एकदा अत्याचार झाला पण तुम्ही मला रोज मारताय….त्याने माझं शरीर दुखावलं आणि समाजाने माझं मन.”

हा प्रसंग आहे “नसरापूर प्रकरण अजून किती?” या शुभम कुलकर्णी यांनी सादर केलेल्या पथनाट्यातील. १ मे २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका ६५ वर्षाच्या नराधमाने कुलकर्णी यांच्या ३ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. या घटनेमुळे राज्यभरात मोठा संताप उसळला होता. या गुन्ह्यातील भीमराव कांबळे याला अटक झाली. (Nasrapur) त्याने आधीही लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केल्याचे समोर आले. न्यायालयाने त्याला २९ जून रोजी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली.न्यालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करताना, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे कुलकर्णी यांना वाटले आणि त्यांनी याविषयावर समाजात जागृती करण्यासाठी आपल्या दिवंगत मुलीच्या नावाने एक चॅरिटेबल फाउंडेशन सुरू केले.

याच सुमारास, ‘मिरॅकल अकादमी ऑफ आर्ट्स अँड मीडिया’ चालवणारे चित्रपट निर्माते प्रमोद प्रभुलकर यांनी या कुटुंबाशी संपर्क साधून (Nasrapur) त्यांच्या कायदेशीर लढ्याला पाठिंबा दर्शवला. प्रभुलकर यांच्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘युथट्यूब’ या मराठी चित्रपटाचा विषयही महिला अत्याचाराशी संबंधित मुद्द्यांवर आधारित होता. १२ सप्टेंबर रोजी कुलकर्णी यांनी प्रभुलकर यांच्याशी भेट घेऊन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पथनाट्यांच्या माध्यमातून मोहीम राबवण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

प्रभुलकर यांनी तात्काळ होकार दिला. त्यांच्या संपर्कातून तरुण कलाकार पथनाट्यासाठी पुढे आले. नाटकाची संहिता मिताली पटवर्धन यांनी तयार केली, तर श्रेयस इंदुलकर यांनी दिग्दर्शन केले. पुण्यातील प्रतिष्ठित कसबा गणपती मंडळात २२ सप्टेंबर रोजी या पथनाट्याचा पहिला प्रयोग झाला, त्यानंतर इतर गणेश मंडळांमध्ये त्याचे प्रयोग झाले. नाटकाच्या शेवटी, शुभम कुलकर्णी स्वतः काही मिनिटांसाठी लोकांसमोर येऊन आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी आसपास वावरणाऱ्या गुन्हेगारी घटकांबद्दल सावध राहण्याचे आवाहन करतात.

या नाटकात मुख्य भूमिका साकारणाऱ्या, अभियंता असलेल्या श्रावणी मोहिते म्हणाल्या, “जेव्हा मी या नाटकाबद्दल ऐकले, तेव्हा मला त्याचा भाग व्हायचे होते; कारण इतर सर्व मुलींप्रमाणे मीही अशा वाईट अनुभवांचा सामना केला आहे. या नाटकाच्या माध्यमातून मला महिलांच्या सुरक्षेच्या चळवळीत योगदान द्यायचे होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्तम आहे. प्रत्येक प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू होते.”लैंगिक अत्याचाराच्या घटना लपवून न ठेवता तात्काळ पोलिसांत तक्रार करावी, जेणेकरून गुन्हेगारांचे धाडस वाढणार नाही, असे हे नाटक सांगते. अत्याचार झाल्यावर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाकडे समाजाने चुकीच्या पद्धतीने पाहू नये असा संदेशही पथनाट्यातून दिला आहे, असे कुलकर्णी आवर्जून नमूद करतात. नाटक संपल्यावर आपत्कालीन संपर्क क्रमांक दाखवले जातात, जेणेकरून अशा घटनांची माहिती मिळताच लोकांनी संपर्क करावा.

कुलकर्णी म्हणाले, “नाटकात न्यायालयीन प्रक्रियेवरही भाष्य केले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली असली, तरी कायदेशीर लढा येथेच संपत नाही, तर तो एक लांबचा प्रवास आहे. खालच्या न्यायालयाच्या आदेशानंतर प्रकरण उच्च न्यायालयात, नंतर सर्वोच्च न्यायालयात जाते. अंतिम न्याय मिळण्यास किती वेळ लागेल हे अनिश्चित असते.(Nasrapur) तसेच, कनिष्ठ न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम राहील याची खात्री नसते. सामान्य माणसासाठी अशी मोठी कायदेशीर लढाई सोपी नसते.” कुलकर्णी हे नाटक पुण्यातील शाळा, नवरात्रोत्सवाच्या आयोजकांपर्यंत नेण्याची योजना आखत आहेत. नाटक संपूर्ण महाराष्ट्रात घेऊन जायची त्यांची इच्छा आहे. “जे माझ्या मुलीचे झाले ते इतर कोणत्याही मुलींच्याबाबतीत घडू नये,” असे कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी आडवा,पाणी जिरवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

नापास झालेल्या कंगना रणौतची राहुल गांधींवर टीका, नवा वाद पेटणार

कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी तत्काळ करा