गुंगी गुडिया! काल आणि आज!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आपल्या राजकीय पक्षात नेमकं काय चाललंय, याच्याकडे लक्ष न देता दुसऱ्या राजकीय पक्षात काय चाललंय ? हे पाहण्याकडे आपली ताकद खर्ची घालण्याचे प्रकार अलीकडच्या राजकारणात जोमाने सुरू आहेत. याला मराठीमध्ये म्हणतात”आपलं ठेवायचं झाकून, आणि दुसऱ्याचं बघायचं………”! सध्या काँग्रेस पक्षाच्या नेत्याकडून हेच सुरू आहे आणि तेही राजकारणात नव्याने आलेल्या एका महिलेच्या संदर्भात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या विद्यमान उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांचा”गुंगी गुडिया”असा अपमानास्पद उल्लेख केला आहे आणि त्यांच्यावर या संदर्भात जोरदार टीका टिपणी सुरू असताना ते आपल्या विधानापासून मागे हटायला तयार नाहीत.

वास्तविक श्रीमती सुनेत्रा पवार या काही राजकारणी नाहीत. किंबहुना सक्रिय राजकारणात येऊन त्यांना फार काळ झालेला नाही. काही राजकीय अपरिहार्य कारणातून त्यांना राज्यसभेवर जावे लागले. आणि अजित दादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अगदी अनपेक्षित पणे सक्रिय राजकारणात उतरावे लागले. (political) त्या या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. पण तरीही त्यांना मुरब्बी राजकारणी म्हणता येणार नाही. अचानक पडलेली जबाबदारी त्या पार पाडत आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्या कोणत्याही राजकीय घडामोडीवर व्यक्त होत नाहीत. आपली प्रतिक्रिया देत नाहीत. अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्या अद्यापही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात त्या धीर गंभीर चेहऱ्याने वावरत असतात. म्हणून काही त्या गुंगी गुडिया ठरत नाहीत. पण काँग्रेसनेच ते अकारण गांभीर्याने घेतलेले आहे.

सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि त्यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्याबद्दल बोलणे हे अगोचरपणाचे लक्षण ठरते. अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले त्याबद्दल त्या काही बोलत नाहीत. विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्या करत नाहीत. भाजपकडून त्यांना अर्थ खाते दिले जात नाही याबद्दल त्या काही बोलत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडी वर त्या भाष्य करत नाहीत, (political) म्हणून त्या गुंगी गुडिया आहेत असे काँग्रेसने म्हटले आहे. राजकीय नैतिकतेची चौकट मोडून काँग्रेसने केलेल्या या विधानाबद्दल सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त झाली नाही तरच नवल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी काँग्रेसच्या या वक्तव्याबद्दल जोरदार आक्षेप घेतला आहे, टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रातील नारी शक्तीचा हा घोर अपमान आहे असे त्यांनी म्हटले आहे. आणि विशेष म्हणजे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त न करता, आपले वक्तव्य मागे न घेता काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांनी आम्ही काहीच चुकीचे बोललो नाही, गुंगी गुडिया हा शब्द असंसदीय नाही. आम्ही सुनेत्रा पवार यांना दिलेली उपाधी योग्यच आहे अशा शब्दात ते समर्थन करताना दिसतात.

इसवी सन 1966 मध्ये श्रीमती इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षातील एक ज्येष्ठ नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधी यांना उद्देशून गुंगी गुडिया असा शब्द वापरला होता. तेव्हा तत्कालीन काँग्रेस मधील नेत्यांनी लोहिया यांना धारेवर धरले होते. पण त्यानंतर अवघ्या पाच वर्षांनी श्रीमती इंदिराजी गांधी यांनी बांगला मुक्ती युद्धात यश मिळवले. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार अटल बिहारी बाजपेयी यांनी इंदिराजी गांधी यांचा”रणरागिनी”असा उल्लेख करून त्यांचा उचित शब्दात सन्मान केला होता. वास्तविक कोणत्याही क्षेत्रातील महिलांचा अवमान होता कामा नये, त्यांना कमी लेखता कामा नये, असे संकेत आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला आदिशक्ती मानले जाते.

पण गेल्या काही वर्षांपासून भारतीय राजकारणाचा पोत काहीसा घसरलेला आहे. राजकारणात सभ्यता राहिलेली नाही. आपल्या पक्षात काय चाललंय इकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्या पक्षात काय चाललंय यातच अनेकांचा इंटरेस्ट दिसतो आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे अजितदादा पवार यांच्या विमान अपघात निधनानंतर फारच गंभीर बनले होते. (political) त्यांनी विमान अपघाताच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. पण सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया हे विशेषण काँग्रेसने लावल्यानंतर तीव्र शब्दात व्यक्त व्हायला हवे होते पण त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला समर्थन दिलेले दिसते. सुनेत्रा पवार यांनी मात्र आपण या संदर्भात वेळ आल्यानंतर उत्तर देऊ असे सांगून काँग्रेसच्या विधानाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी त्याला फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?