शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात खानापूर व पलूस परिसरातील शेतकरी, महिला आणि तरुणांनी बुधवारी पलूसमध्ये प्रचंड आक्रोश व्यक्त केला. शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड आणि महावितरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. श्रीदास होनमाने यांच्या नेतृत्वाखाली हजारो बाधित शेतकरी व महिलांनी जुने बसस्थानक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चा काढून प्रशासनाला धडक दिली.सकाळी दहा वाजल्यापासूनच जुन्या बसस्थानक परिसरात सांगली जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी, महिला व तरुण मोठ्या संख्येने जमा झाले होते. तेथून निघालेला मोर्चा आंबोली रोडमार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. ‘शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे’, ‘शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने लाटू नका’, ‘आमची जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची’ अशा घोषणांनी संपूर्ण पलूस शहर परिसर दणाणून गेला होता.

मोर्चाला संबोधित करताना ॲड. दीपक लाड म्हणाले की, विट्यातील महिलांच्या ऐतिहासिक लाटणे मोर्चानंतर बुधवारी पलूसमध्ये झालेली गर्दी सरकारचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी आहे. हा महामार्ग विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यातील हजारो एकर सुपीक व बागायती जमीन कोणत्याही परिस्थितीत शासनाच्या घशात घालू देणार नाही. प्रा. श्रीदास होनमाने यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शेतकऱ्यांचा हा जनक्षोभ केवळ सुरुवात आहे. शासनाने हा विनाशकारी महामार्ग त्वरित रद्द केला नाही, तर आगामी काळात संपूर्ण सांगली जिल्हा ठप्प केला जाईल. हा लढा आता आरपारचा झाला आहे.
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीने प्रांत अधिकारी रणजित भोसले यांच्याकडे मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्याची आणि भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पुढे न नेण्याची ठाम मागणी करण्यात आली. विटा येथील लाटणे मोर्चानंतर पलूसमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन आता तीव्र जनआंदोलनाचे रूप धारण करत असल्याचे चित्र आहेया मोर्चामध्ये बी. जी. पाटील, व्ही. वाय. पाटील, सुभाष पाटील, दिगंबर कांबळे, आरपीआयचे महादेव होवाळ, शेतकरी संघटनेचे राजेश जाधव, आरपीआयचे अविनाश कालिबाग, जयराम काटकर, चंद्रकांत जगताप, उमेश निकम, विद्याधर महाडिक, महेश कुपाडे, करिष्मा जाधव आणि रावसाहेब गोंदील आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?