राज्यात अनेक ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. समाधानकारक पाऊस होऊनही पेरणीनंतर पीक उगवले नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. (Farmers) अशा परिस्थितीत बोगस बियाणे कसे ओळखायचे, कोणती खबरदारी घ्यायची आणि तक्रार कुठे करायची, याची माहिती प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे आवश्यक आहे.

बियाणे खरेदीपूर्वी आणि पेरणीपूर्वी घ्या ही काळजी बियाणे खरेदी करताना केवळ अधिकृत आणि परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. व्यवहाराचे पक्के बिल घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण भविष्यात बियाण्यांबाबत तक्रार करायची असल्यास हे बिल महत्त्वाचा पुरावा ठरते. बियाण्याच्या पाकिटावरील प्रमाणपत्र टॅग, उत्पादन आणि मुदत समाप्तीची तारीख तसेच इतर माहिती काळजीपूर्वक तपासावी. कमी किमतीच्या आमिषाला बळी पडून फेरीवाले किंवा अनधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करणे टाळावे. अनेकदा जुन्या बियाण्यांची नव्या पॅकिंगमध्ये विक्री केली जाते, त्यामुळे उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होऊ शकते.
बियाण्यांचे पाकीट उघडल्यानंतर त्यातील काही बियाणे वेगळी ठेवावीत. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासण्यासाठी ओल्या गोणपाटावर 100 दाणे 10-10 च्या ओळीत आणि सुमारे दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर ठेवावेत. (Farmers) त्यावर दुसरा ओला गोणपाट टाकून गुंडाळी तयार करावी आणि सात दिवस नियमित पाणी शिंपडावे. त्यानंतर गोणपाट उघडून बियाण्यांची उगवण तपासावी. जर 100 पैकी किमान 70 दाण्यांना चांगले कोंब फुटले असतील, तर त्या बियाण्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे समजावे. बाजारातील किंवा घरातील साठवलेल्या बियाण्यांबाबतही हीच चाचणी करूनच पेरणी करावी.
जमिनीची तपासणी आणि तक्रार प्रक्रिया बियाणे निवडताना केवळ बाजारात मागणी आहे म्हणून एखाद्या वाणाची निवड करू नये. आपल्या जमिनीचा पोत, गुणवत्ता, आम्लता, क्षारांचे प्रमाण आणि उत्पादन क्षमता यांची तपासणी करून त्यानुसार योग्य बियाण्याची निवड करणे आवश्यक आहे. (Farmers) अनेकदा नामांकित कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली पॅकिंग, रंगसंगती किंवा डिझाइन वापरून बोगस बियाण्यांची विक्री केली जाते. त्यामुळे पॅकेजिंगची काळजीपूर्वक पडताळणी करावी आणि अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. बोगस बियाण्यांची विक्री किंवा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग जिल्हा आणि तालुका स्तरावर विशेष पथके नियुक्त करत असतो. शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांबाबत कोणतीही शंका असल्यास किंवा फसवणूक झाल्याचे आढळल्यास तातडीने तक्रार नोंदवता येते. यासाठी कृषी विभागाने 18002334000 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. वेळेत तक्रार नोंदविल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाऊ शकते.
हेही वाचा :
बच्चू कडू आक्रमक मंत्र्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव केला सादर?