कुरळप भावकीतील वादातून डोळ्यादेखत मुलाला झालेल्या मारहाणीचा धक्का सहन न झाल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे घडली. (incident) तानाजी बंडू रास्कर (वय ७६) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास येडेनिपाणी गावातील बिरोबा मंदिरासमोरील चौकात घडली.

या प्रकरणी त्यांचा मुलगा हणमंत तानाजी रासकर (वय ४०, रा. बिरोबा मंदिराजवळ, येडेनिपाणी) यांनी कुरळप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित इंद्रजित सोमाजी रासकर व सूरज पांडुरंग रासकर (दोघेही रा. येडेनिपाणी, ता. वाळवा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि संशयित हे एकाच भावकीतील आहेत. भावकीतील कार्यक्रमांमध्ये फिर्यादी हणमंत रासकर पुढाकार घेत असल्याने, आपल्याला कमी लेखले जात असल्याची भावना संशयितांच्या मनात होती. (incident) याच कारणावरून त्यांनी शुक्रवारी हणमंत रासकर यांना चौकातील सार्वजनिक रस्त्यावर गॅसच्या रबरी पाईपने बेदम मारहाण केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून हणमंत यांचे वडील तानाजी रास्कर हे मध्यस्थी करण्यासाठी घटनास्थळी धावले. त्या वेळी संशयित सूरज रास्कर याने मोठ्याने ओरडून त्यांना बाजूला होण्यास सांगितले.
डोळ्यांदेखत मुलाला होणारी मारहाण आणि तेथील परिस्थितीचा तीव्र मानसिक धक्का बसल्याने तानाजी रास्कर चक्कर येऊन जमिनीवर बेशुद्ध पडले. (incident) त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्याला होत असलेल्या मारहाणीचा मानसिक धक्का बसल्यानेच वडिलांचा मृत्यू झाल्याचे हणमंत रासकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेनंतर कुरळप पोलिस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. माने करीत आहेत.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’