मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड आणि पालघर या भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून, कल्याणजवळील आडीवली-ढोकळी परिसर सर्वाधिक प्रभावित झाला आहे. (Mumbai) सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून, रस्ते, सोसायट्या आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सलग कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील अनेक सोसायट्या, चाळी आणि अंतर्गत रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे. तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी घुसल्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांना रातोरात आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले.रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूकही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. (Mumbai) अनेक वाहनचालकांना पाण्यातूनच मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, काही ठिकाणी वाहने बंद पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे तातडीने पाण्याचा निचरा करण्याची मागणी केली आहे. वारंवार अशा प्रकारे पाणी साचत असल्याने कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. (Mumbai) त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, पाणी साचलेल्या भागातून जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता, पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई महानगर प्रदेशातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?