सहकारी साखर कारखान्यांवर सरकारचे नियंत्रण वाढणार

सहकारी साखर कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारने आर्थिक निकष अधिक कठोर केले आहे. कर्जाला १०० कोटींची मर्यादा घातली आहे. तसेच कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांवरील नियंत्रणही वाढविले आहे. कर्जाची परतफेड होईपर्यंत साखर आणि इथेनॉल विक्रीतून ठरावीक रक्कम थेट वळती करणे, नवीन प्रकल्प किंवा स्थिर मालमत्तेतील गुंतवणुकीसाठी सरकारची पूर्वपरवानगी घेणे, तसेच कारखान्यांच्या आर्थिक व्यवहारांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Government) त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनावर आणि आर्थिक निर्णयप्रक्रियेवर राज्य सरकारचा वरचष्मा राहणार आहे. कर्जाच्या परतफेडीत अनियमितता आढळल्यास कर्जमंजुरी रद्द करून संपूर्ण रक्कम वसूल करण्याचे अधिकारही सरकारने राखून ठेवले आहेत.

सहकार विभागाने २७ नोव्हेंबर रोजी यासंदर्भात शुद्धिपत्रक काढून राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) महाराष्ट्र सरकारमार्फत सहकारी साखर कारखान्यांना खेळते भांडवल आणि भांडवली खर्चासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या २५ जून २०२५ रोजीच्या सुधारित धोरणातील अटी व शर्तींमध्ये बदल केले आहेत.या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३६ सहकारी साखर कारखान्यांच्या ४१ कर्जप्रकरणांना ५,४८८ कोटी ८४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर करून वितरित करण्यात आले आहे. (Government) मात्र, मुद्दल आणि व्याज थकबाकी वाढते आहे. पुरेशी परतफेड क्षमता नसतानाही मोठ्या कर्जाची मागणी होत असल्याने सरकारी निधी अडकण्याचा आणि राज्य सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जवाटपापासून वसुलीपर्यंतच्या प्रक्रियेत कठोर अटी लागू करण्यात आल्या आहेत.

नव्या निकषांनुसार, एका कारखान्याला एफएसीआरनुसार पात्र ठरणारी कर्जरक्कम किंवा १०० कोटी रुपये यापैकी कमी रकमेचेच कर्ज मिळू शकेल. कारखान्याचे स्थिर मालमत्ता आणि कर्जाचे प्रमाण (एफएसीआर) किमान १:१.५, तर कर्ज परतफेड क्षमतेचे प्रमाण (डीएससीआर) किमान १.३३ पट असणे आवश्यक आहे. संभाव्य परतफेड क्षमतेची आकडेवारी मागील तीन आर्थिक वर्षांच्या प्रत्यक्ष आर्थिक कामगिरीशी सुसंगत असावी. तसेच, कारखान्याचा संचित तोटा ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक नसावा.

या निकषांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखान्यांना कर्ज मिळणे तुलनेने सोपे होईल. मात्र, मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या आणि संचित तोटा अधिक असलेल्या कारखान्यांना कर्ज मिळविण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे.कर्जाच्या परतफेडीसाठी साखर विक्रीतून किमान २५० रुपये प्रति क्विंटल किंवा इथेनॉल विक्रीतून प्रति लिटर ठरावीक रक्कम टॅगिंगद्वारे वळती केली जाणार आहे. शासकीय येणे बाकी असल्यास लागू दराने अतिरिक्त कपातही करावी लागेल. ही रक्कम कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या संयुक्त खात्यात जमा होईल. कपात प्रमाणित झाल्यानंतरच साखर किंवा इथेनॉल कारखान्याबाहेर नेण्यासाठी गेटपास दिला जाईल.यामुळे साखर आणि इथेनॉल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वापरावरही शासनाचे नियंत्रण राहणार आहे. कर्जफेडीसाठीची रक्कम वळती केल्यानंतरच उर्वरित उत्पन्नाचा वापर कारखान्यांना करता येईल. त्यामुळे ऊस उत्पादकांची देणी, कामगारांचे वेतन आणि दैनंदिन खर्चाचे नियोजन करताना कारखान्यांना आर्थिक ताळमेळ साधावा लागणार आहे.

कर्ज पूर्ण फेडेपर्यंत शासन आणि एनसीडीसीच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन प्रकल्प उभारता येणार नाहीत किंवा स्थिर मालमत्तेत गुंतवणूक करता येणार नाही. कारखान्याच्या व्यवस्थापनात बदल झाल्यास त्याची माहितीही तातडीने द्यावी लागेल. कर्जाचा विनियोग, व्याजाची स्थिती, परतफेड आणि तारण मालमत्तेची तपासणी करण्यासाठी प्रत्येक कारखान्यावर विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ (साखर) नियुक्त केला जाणार आहे.केंद्र किंवा राज्य शासनाकडून मिळणारे अनुदानही कर्जाची पूर्ण परतफेड होईपर्यंत कर्जाच्या मुद्दल आणि व्याजापोटी कर्जखात्यात जमा करणे बंधनकारक असेल. कर्जाच्या अटींचे उल्लंघन झाल्यास कर्जमंजुरी रद्द करून संपूर्ण मुद्दल आणि व्याज वसूल करण्याचा अधिकार सरकारला असेल. (Government) परतफेड क्षमतेचे प्रमाण एकापेक्षा कमी झाल्यास संचालकांची वैयक्तिक हमी आणि अतिरिक्त मालमत्ता तारण यांसारख्या उपाययोजनाही कराव्या लागतील. या सुधारणांमुळे कारखान्यांच्या आर्थिक स्वायत्ततेवर मर्यादा येणार आहेत. कर्जाच्या परतफेडीच्या नावाखाली कारखान्यांच्या विक्री उत्पन्नापासून नवीन गुंतवणुकीपर्यंतच्या निर्णयांमध्ये शासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या