महाराष्ट्राला मिळाली आणखी एक नवीन एक्स्प्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भुसावळ ते नागपूरदरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली. या नव्या रेल्वेमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या दोन विभागांतील प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे.

भुसावळ-नागपूर नवीन एक्स्प्रेसला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करून नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल (Maharashtra) त्यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले. या गाडीमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

या नवीन एक्स्प्रेसच्या मार्गाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, ही गाडी नेहमीच्या अकोला-बडनेरा-वर्धा या मार्गाऐवजी मध्य प्रदेशातून धावण्याची शक्यता आहे. भुसावळहून खंडवा, इटारसी, बैतूल, आमला आणि पांढुर्णामार्गे ही एक्स्प्रेस नागपूरला पोहोचू शकते.(Maharashtra) या प्रवासादरम्यान भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा, तलवडिया, छनेरा, खिरकिया, हरदा, टिमरनी, इटारसी, घोडाडोंगरी, बैतूल, आमला जंक्शन, मुलताई, पांढुर्णा, नरखेड आणि काटोल या स्थानकांवर थांबे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गाडी कधीपासून सुरू होणार दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून या नवीन एक्स्प्रेसच्या परिचालनाला मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष गाडी सुरू होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. (Maharashtra )तसेच आठवड्यातील कोणत्या दिवशी ही गाडी धावणार आणि तिचे सविस्तर वेळापत्रक काय असेल, याची माहितीही समोर आलेली नाही. मध्य रेल्वेकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या नवीन एक्स्प्रेसमुळे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या गाडीचे अधिकृत वेळापत्रक आणि प्रत्यक्ष प्रारंभाची तारीख कधी जाहीर होते, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या